नांदेड येथे शंकर नागरी सहकारी बँकेत १४ कोटी रुपयांचा ऑनलाईन दरोडा ! 

मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची बँकेची चेतावणी 


नांदेड – शहरातील वजिराबाद येथील शंकर नागरी सहकारी बँकेत ७ जानेवारी या दिवशी १४ कोटी रुपयांचा ऑनलाईन दरोडा पडला आहे. या प्रकरणात ‘हॅकर’ने आयडीबीआय बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील १४ कोटी रक्कम आर्.टी.जी.एस्.द्वारे ही हडप केली आहे. या प्रकरणी शंकर नागरी बँकेने सावध भूमिका घेत ‘हॅकर’ने पळवलेली १४ कोटी रुपयांची रक्कम आयडीबीआय बँकेने तात्काळ शंकर नागरी बँकेच्या खात्यात जमा न केल्यास आयडीबीआय बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करू, अशी चेतावणी दिली आहे. यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शंकर नागरी बँकेकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे; मात्र अद्याप कोणताही गुन्हा नोंद झाला नाही.


यामध्ये शहरातील आयडीबीआय बँकेच्या खात्यातून अनेक नावांनी खाती उघडून त्यांतील ५ लाख रुपयांच्या आत रक्कम काढली. ही सर्व रक्कम आर्.टी.जी.एस्. आणि एन्.ई.एफ्.टी यांद्वारे काढली गेली आहे. याविषयी शंकर नागरी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.डी. राजे यांनी हॅकरने बँकेच्या खात्यातील १४ कोटी रुपये  आर्.टी.जी.एस्. आणि एन्.ई.एफ्.टी.ने आपल्या खात्यावर वळवले आहेत; मात्र या १४ कोटी रकमेविषयी आयडीबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपेश कोडगिरे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.