कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री
कोल्हापूर – कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू. यासाठी सरकारकडे फेरप्रस्ताव सादर करा, अशा सूचना नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. श्री. एकनाथ शिंदे यांनी ८ जानेवारी या दिवशी कोल्हापूर महापालिकेला भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी या सूचना त्यांनी दिल्या. या वेळी आरोग्य राज्यमंत्री श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, राज्याच्या नगरविकासचे प्रधान सचिव महेश पाठक यांसह अन्य उपस्थित होते.
श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘शहरातील जे प्रलंबित प्रश्न आहेत, त्यासंबंधीचे प्रस्ताव सरकारकडे पाठवा. ते तात्काळ सोडवू. श्री महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे कामही लवकर करू. रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी आवश्यक तो निधी देऊ. शाहू मिल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच याविषयी निर्णय घेऊ.’’
या वेळी महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी ‘स्लाईड शो’द्वारे महापालिकेच्या कामांची माहिती दिली. महापालिका इमारत ही ऐतिहासिक वारसा असलेली आहे. त्यात पालट करणे शक्य नाही, त्यामुळे महपालिकेने आरक्षित केलेल्या निर्माण चौक येथील जागेमध्ये महापालिकेची प्रशस्त इमारत बांधण्यासाठी ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. यासाठी आवश्यक तो निधी संमत करावा, अशी विनंती केली.