द्रुतगती मार्गावर सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना व्यवहार्य नसल्याचे कारण देत गुंडाळली !
योजना ठरवतांना त्याचा सर्व बाजूने विचार करून ती अमलात आणणे हा योग्य मार्ग आहे. आताची योजना ठरवतांना व्यय झालेला वेळ आणि पैसा याला उत्तरदायी कोण ?
पुणे – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण अल्प करण्यासाठी, तसेच बेशिस्त वाहतुकीला आळा बसावा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून प्रति ४ किलोमीटर अंतरावर सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याची योजना आखली होती; मात्र ही योजना अव्यवहार्य असल्याचे कारण देत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ही योजना गुंडाळण्यात आली आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही छायाचित्रकांचा वापर करण्यात येत आहे; मात्र अपुरे मनुष्यबळ आणि साधनसामुग्री यांमुळे कारवाईला मर्यादा येत आहेत. याविषयी महामंडळाचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता आ.पं. नागरगोजे यांनी सांगितले की, ही योजना अव्यवहार्य वाटल्याने मंत्रालय स्तरावरच स्थगित केली आहे.