भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे वायूप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ५० सहस्र गर्भपात !
|
नवी देहली – भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांत मोठ्या प्रमाणात होणार्या वायुप्रदूषणामुळे प्रतिवर्षी ३ लाख ४९ सहस्र ६८१ गर्भपात होतात, असे लँसेट हेल्थ जर्नलच्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. ‘वायूप्रदूषणाचा थेट गर्भपाताशी संबंध आहे’, असे या संशोधनातून दिसून आले आहे. ‘जगात ज्या भागात सर्वाधिक हवा प्रदूषित आहे, तेथे गर्भाची हानी, गर्भपात आणि मृत अर्भक जन्माला येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे’, असे यातून समोर आले आहे. जगात प्रदूषित हवेमुळे २९ टक्के गर्भपात होतात. दक्षिण आशियात वायूप्रदुषणामुळे गर्भधारणेवर होणारा परिणाम दाखवणारे हे पहिले संशोधन आहे. गर्भाची हानी जगात दक्षिण आशियात सर्वाधिक असून तो जगातील सर्वाधिक ‘पीएम्’ (प्रदूषण मापण्याचे एकक) २.५ प्रदूषित भाग आहे.
१. संशोधनानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्या उत्तर भागात असणार्या वायूप्रदूषणाचा गर्भपाताशी थेट संबंध आहे. शहरी भागात अल्प वयाच्या मातांच्या तुलनेत अधिक वयाच्या मातांना अधिक धोका आहे. संशोधकांनी वर्ष १९९८ पासून २०१६ पर्यंतच्या आकडेवारीवर अभ्यास केला. संशोधनात गर्भपात झालेल्या ३४ सहस्र १९७ महिलांचा समावेश करण्यात आला होता.
२. मुख्य संशोधक असणारे पीकिंग विद्यापिठाचे लेखक साहाय्यक प्राध्यापक डॉ. टाओ झुई यांनी म्हटले आहे की, जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा पीएम् २.५ चे सूक्ष्म प्रदूषित कण फुप्फुसात जातात आणि रक्तात मिसळतात. सर्वाधिक प्रदूषित कण ऊर्जा प्रकल्प, उद्योग आणि वाहनांचे उत्सर्जन यांतून निघतात. हे कण फुप्फुस आणि हृदयाशी संबंधित आजार आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तरदायी असतात.
३. संशोधकांनी सूक्ष्म धूलिकणांवर लक्ष केंद्रित केले. त्यांना वर्ष २००० ते २०१६ या कालावधीत आढळले की, दक्षिण आशियात गर्भधारणा झालेली महिला प्रदूषित हवेत गेल्याने ७.१ टक्के गर्भपात झाले. भारताची सध्याची वायू गुणवत्ता ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वायू गुणवत्ता मार्गदर्शक सूचनेनुसार १० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर सुरक्षित मानले जाते.