जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये २०० एकर जागेत भीषण आग
राजापूर – तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या भडकलेल्या आगीमध्ये २०० एकर जागेतील गवत जळून खाक झाले आहे.
७ जानेवारीला रात्री साडेआठच्या सुमारास ही आग अधिक भडकली होती. वार्यासमवेत भडकलेल्या आगीचे लोण जैतापूर प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पसरले होते. ही आग विझवण्यासाठी राजापूर येथील अग्नीशमन बंबाला बोलावण्यात आले. काही ग्रामस्थांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. दोन घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. ही आग नेमकी कशी लागली ? हे स्पष्ट झाले नसले, तरी ‘शॉर्टसर्किट’ने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.