वाडा (जिल्हा पालघर) येथे बोअरस्फोटामुळे श्री परशुरामाच्या पुरातन मंदिराला धोका
प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून बोअरस्फोटामुळे होणारे परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना काढावी आणि मंदिराचे संरक्षण करावे ! |
पालघर – वाडा तालुक्यातील गुंजकाटी येथे श्री परशुरामाचे पुरातन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. मंदिराच्या शेजारील दगडखाणीत प्रतिदिन बोअरस्फोट केले जातात. या जोरदार धक्क्यांमुळे मंदिराला धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांच्या घरांना तडे गेले आहेत. त्यातच विहिरी आणि कूपनलिका यांचीही हानी होत असल्याने बोअरस्फोट बंद करावेत, अशी मागणी गुंज येथील ग्रामस्थांनी वाडा येथील तहसीलदारांकडे केली आहे.
१. एका बोअरस्फोटामुळे जास्त दगडांचे उत्खनन होत असल्याने दगडखाण मालक शासनाचे नियम धाब्यावर बसवून बोअरस्फोट करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
२. बोअरस्फोटामुळे भूगर्भात पालट होत असून गावातील विहिरी कोसळून पडण्याची, तर कूपनलिकेतील पाणी न्यून होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच शेतीवर अवलंबून असणार्या शेतकर्यांना हानीला सामोरे जावे लागणार असल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवर गुंज गावातील अनुमाने ५२ ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.
३. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा पुरातन श्री परशुराम मंदिराच्या सुरक्षिततेसाठी आणि शेतकर्यांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी ग्रामस्थांनी दिली.
४. ‘याविषयी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल’, असे वाडा येथील नायब तहसीलदार सुनील लहांगे यांनी सांगितले आहे.