महाराष्ट्र शासनाकडून पोलीस भरतीचा आदेश रहित

श्री. अनिल देशमुख

मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाकडून ४ जानेवारी या दिवशी काढण्यात आलेल्या पोलीस भरतीचा आदेश रहित करण्यात आला आहे. या आदेशामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण न देता त्यांना खुल्या प्रवर्गातून भरतीप्रकियेत सहभागी होण्याचे नमूद केले होते. याला मराठा समाजाकडून विरोध झाल्यामुळे शासनाने हा आदेश मागे घेतला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुधारित आदेश काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय शासनाने घेतला; मात्र सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ही प्रक्रिया रहित केली. आता मराठा समाजाकडून विरोध झाल्याने भरतीप्रक्रिया पुन्हा रहित करण्याची वेळ शासनावर आली आहे.