५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली फोंडा (गोवा) येथील कु. साक्षी संगम बोरकर !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) युवा म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. साक्षी बोरकर एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष एकादशी (९.१.२०२१) या दिवशी कु. साक्षी संगम बोरकर हिचा तिथीनुसार १६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
(‘वर्ष २०१९ मध्ये कु. साक्षी हिची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती.’ – संकलक)
कु. साक्षी संगम बोरकर हिला १६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. प्रामाणिकपणा
‘कु. साक्षी इयत्ता दहावीत आहे. सध्या दळणवळण बंदी असल्याने सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन चालू आहे. त्यामध्ये घरी राहून ऑनलाईन परीक्षाही घेतल्या जातात. परीक्षेच्या अंतर्गत शिक्षक प्रश्नपत्रिका ऑनलाईन पाठवतात आणि विद्यार्थ्यांनी घरी बसून ती प्रश्नपत्रिका सोडवायची असते. सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे छायाचित्र काढून ते शिक्षकाला पाठवायचे असते. अशी एक परीक्षा ती देत होती. तिने उत्तरे लिहिली होती आणि त्याचे छायाचित्र काढून पाठवायचे राहिले होते. त्या वेळी कु. साक्षी आणि माझ्यात झालेले संभाषण पुढे देत आहे.
मी : सर्व व्यवस्थित लिहिले आहे ना ? कारण हे गुण अंतिम गुणपत्रिकेत घेतले जातील.
कु. साक्षी : मला २ प्रश्नांची उत्तरे नीट येत नाहीत, तरी मी लिहायचा प्रयत्न केला आहे.
मी : तुला येत नसेल, तर पुस्तकात पाहू शकतेस.
कु. साक्षी : ही परीक्षा आहे. मला पुस्तकात पाहून उत्तर लिहायचे नाही. जे गुण मिळतील, ते मला माझ्या प्रयत्नानुसार मिळू दे.
तिचे हे उत्तर ऐकून मला स्वतःचीच लाज वाटली आणि मी तिला अप्रामाणिकपणाची कृती करायला सांगितल्याविषयी तिची आणि गुरुदेवांची क्षमा मागितली. या प्रसंगातून साक्षीमधील ‘प्रामाणिकपणा’ हा गुण देवाने मला शिकवला. ‘स्वतःचा स्वार्थ न पहाता तत्त्वनिष्ठ राहून कृती केल्यानेच देवाची कृपा होत असते’, हे या प्रसंगातून देवाने मला शिकवले.
२. वागण्या-बोलण्यात सहजता असणे
तिला एखादे सूत्र सांगायचे असेल, तर ती कोणताही संकोच न करता सहजतेने सूत्र मांडते. ‘त्याविषयी तिला कुणी काही बोलेल का ? दुसरा काय विचार करील ?’, याचा ती विचार करत नाही. तिच्या या स्वभावामुळे आम्हाला (मला आणि माझ्या पत्नीला) शिकता येते आणि तिच्याशी मोकळेपणाने बोलता येते.
३. घरातील सेवांचे आणि स्वतःचे दायित्व स्वतःच घेणे
मागील ४ – ५ मासांपासून माझे आई-वडील आजारी असल्याने मला बर्याच वेळा रुग्णालयात जावे लागायचे. काही दिवस घरी यायला मिळायचे नाही. पत्नीही नोकरी करत असल्याने साक्षीला घरी एकटे रहावे लागत होते. याविषयी तिने कधीच तक्रार केली नाही. स्वतःचा अभ्यास सांभाळून घरातील सेवा, सकाळचा अल्पाहार आणि दुपारचे जेवण काही वेळा ती स्वतःच करायची. आई-वडिलांच्या आजारामुळे मला तिच्या अभ्यासाकडे लक्ष देणे शक्य नसायचे. त्या वेळी तिने मला सांगितले, ‘‘माझ्या अभ्यासाची चिंता करू नका. मी स्वतः प्रयत्न करते.’’
४. जिज्ञासू
ऑनलाईन चालू असलेल्या बालसंस्कार वर्गातील विषयांच्या संदर्भात साक्षीला जिज्ञासा असते. त्यातील तिला जे सूत्र कळत नाही, ते लगेच ती विचारते.
५. शिकण्याची वृत्ती
‘एखादी गोष्ट कळत नसेल, तर ती लगेच शिकून घेणे’, हा तिचा गुण आहे. घरात एखादी नवीन गोष्ट आणली आणि ती वापरायला आम्हाला कळत नसेल, तर ती त्याचा अभ्यास करून शिकून घेते आणि आम्हाला ‘कसे करायचे ?’, हे दाखवते.
६. समंजसपणा
साक्षीला बाजारातून काही गोष्टी घ्याव्याशा वाटतात; मात्र ‘आम्ही तिला ती आता घ्यायला नको’, असे सांगितले, तर तिचा कसलाच हट्ट नसतो. सांगितलेले सूत्र ती लगेच स्वीकारते. घरी काही कारणांसाठी आमच्यात जर काही वाद होत असेल, तर ती लगेच मधे येऊन ‘लहान मुलांसारखे का वागता ?’, असे म्हणून आमच्यातील वाद सोडवते.
७. कर्तेपणा स्वतःकडे न घेणे
तिला स्वयंपाक आणि चित्रकला यांची आवड आहे. घरी तिने एखादी नवीन गोष्ट केली आणि आम्ही तिचे कौतुक केले, तर ती त्याचा कधीच कर्तेपणा घेत नाही. ‘हे मी केले नाही. मी त्यांच्याकडून करायला शिकले’, असे तिचे उत्तर असते.
८. स्वभावदोष
आळस आणि वेळेचे गांभीर्य नसणे
तिच्यासाठी साधनेच्या दृष्टीने पोषक वातावरण नाही, तरीही तिच्यातील गुण पाहून तिच्याकडून मला पुष्कळ शिकता येते. गुरुदेवांचे तिच्यावर लक्ष असल्यानेच तिच्यातील साधकत्व वृद्धींगत होत असल्याचे मला जाणवते.
‘गुरुदेवांच्या कृपेनेच साक्षीमधील गुणांमधून गुरुदेव मला शिकवत आहेत’, याबद्दल मी श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. गुरुदेवांनीच हे लिखाण करवून घेतले. ते त्यांच्याच पावन चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.’
– श्री. संगम प्रफुल्ल बोरकर (कु. साक्षीचे वडील), फोंडा, गोवा. (२३.१२.२०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |