परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !
वर्ष २०२० मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने दाखवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.
१. साधनेमध्ये कर्मफलत्यागाचे महत्त्व
१ अ. स्वेच्छा आणि कर्मफळाची अपेक्षा ठेवल्यामुळे दुःख होते; त्यामुळे स्वेच्छा ठेवू नका आणि कर्मफळाचा त्याग करा !
साधिका : कधी कधी माझ्या मनात यजमानांविषयी अयोग्य विचार येतो. ‘एवढ्या प्रेमाने मी त्यांचा स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करते; परंतु ते ऐकतच नाहीत’, असे मला वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : येथे दोन सूत्रे आली. पहिले सूत्र, म्हणजे ही तुमची स्वेच्छा झाली. ‘दुसर्याने काय करावे ?’, हे आपल्या हातात नसते. आपलेच मन आपल्या हातात नाही, तर ‘दुसर्यामध्ये परिवर्तन होईल’, असा विचार कसा करू शकतो ? स्वेच्छा, परेच्छा, ईश्वरेच्छा ठाऊक आहे ना ? सर्व ईश्वरेच्छेने होते. आपल्या इच्छेमुळे काहीच होत नसते. स्वेच्छा ठेवली, तर दुःख होते. त्याविषयी स्वयंसूचना द्या.
दुसरे सूत्र असे आहे की, तुम्ही त्यांना साधनेविषयी सांगितल्यावर त्यांनी ऐकले नाही, केले नाही, तर कोणता नियम लक्षात यायला पाहिजे ? कर्मफळ. आपण कर्मफळाची अपेक्षा करतो. ते चुकले. ‘त्यांना सांगणे’, हे तुमचे कर्म आहे; पण ‘करणे, न करणे’, हे त्यांच्या हातात असते आणि केव्हापर्यंत सांगणार ? तेही काही मर्यादेपर्यंतच सांगायचे, नाहीतर नंतर भांडणे होऊ लागतात. त्यापेक्षा ते सोडून द्यायचे. त्यांची प्रकृती तशीच आहे. स्वेच्छासुद्धा असायला नको आणि कर्मफलत्यागही करता यायला पाहिजे.
२. साधनेमध्ये अनुभूतीचे महत्त्व
२ अ. साधनेत अनुभूती महत्त्वाची असते !
साधक : मला जेव्हा समजले की, तुम्हाला भेटायचे आहे, तेव्हा मी स्वतःला रोखू शकलो नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते (माझा भाव जागृत झाला होता.) मला समजत नव्हते, ‘हे घडत आहे, ते योग्य आहे का ?’; पण ते खरेच घडत होते. अतिशय वेगळी अनुभूती होती. असे मी या पूर्वी कधीच अनुभवले नव्हते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हे महत्त्वाचे आहे. साधनेत अनुभूती महत्त्वाची असते. बुद्धीला ग्रंथसुद्धा शिकवू शकतात. एकदा मुंबईची एक साधिका आली. जसे सर्व साधक करतात, तसे ती नामजप इत्यादी करते. तिला अनुभूतीसुद्धा येतात. तिचे यजमान तिच्यासह होते. ते म्हणाले, ‘‘मी नामजप इत्यादी करत नाही; परंतु माझ्याकडे नामजपावर ५०० ग्रंथ आहेत. मी त्यांचा अभ्यास केला आहे. अनुभूती काही नाही.’’ या बुद्धीवाद्यांचे असेच असते. तेव्हा मी म्हटले, ‘‘ठीक आहे. तो तुमचा मार्ग आहे. या साधिकेचा हा मार्ग आहे.’’ ६ – ७ मासांनंतर ते दोघे पुन्हा भेटायला आले. साधनेसंबंधी शिबिर होते. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘मी सर्व पुस्तके (इतरांना) वाटून टाकली. नामजप केल्यामुळे जी अनुभूती आली, तशी एवढा अभ्यास केल्यानंतरसुद्धा कधीच आली नव्हती.’’
२ आ. अनुभूतीतून साधना करण्यासाठी प्रेरणा मिळते !
साधक : मला दीड वर्षात विशेष अशी अनुभूती येत नव्हती; परंतु आजचा दिवस असा आहे की, मला केवळ अनुभूतीच अनुभूती येत आहेत. त्यामुळे आजचा दिवस पुष्कळ चांगला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अनुभूतीमुळे साधना करण्यासाठी आणखी प्रेरणा मिळते. जेवढे वाचाल, तेवढे बुद्धीला जडत्व येते. आपण मनोलय आणि बुद्धीलय म्हणतो ना ? बुद्धी नष्टच करायची आहे, तर वाचून वाचून तिला जड कशाला करायचे ? एवढे संत-महात्मे होऊन गेले. त्यांनी ग्रंथांचा अभ्यास केला होता का ? साधना करूनच ते पुढे गेले.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |