५६ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिच्याविषयी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे !
१. बालसाधिका अपालाने ‘मृत्यूनंतर जिवाचे काय होते ?’, याविषयी आजोबांना समजावून सांगणे
‘कु. अपालाने एका अभिनेत्याने केलेल्या आत्महत्येविषयी ‘पॅरानॉर्मल’तज्ञांनी जे सांगितले, त्याची वार्ता दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वाचली होती. त्याविषयी तिच्या आजी-आजोबांशी बोलत असतांना तिच्यात आणि आजोबांमध्ये (वय ७२ वर्षे) पुढील संवाद झाला.
आजोबा : असे आत्मा वगैरे काही नसते. हे सर्व खोटे आहे. एकदा मनुष्य मेला, की नंतर काय होते, हे कुठे ठाऊक आहे ?
कु. अपाला : मला ठाऊक आहे, आबा.
आजोबा : मग सांग बघू, तुला काय ठाऊक आहे ते ?
कु. अपाला : अहो आबा, माणसाच्या मृत्यूनंतर त्या आत्म्याला ‘लिंगदेह’ म्हणतात. ती व्यक्ती चांगली असेल, तर तो लिंगदेह हलका असतो आणि वाईट असेल, तर तो जड होतो अन् भुवर्लोकात अडकतो.
आजोबा : चांगली व्यक्ती म्हणजे कशी ? मग त्यांचा आत्मा कुठे जातो ?
अपाला : चांगली व्यक्ती म्हणजे साधना करणारी, चांगले काम करणारी. अशा व्यक्ती मृत्यूनंतर स्वर्गलोकात जातात आणि त्यांनी जितके पुण्य केलेले असते, तेवढे दिवस त्या स्वर्गात सुख उपभोगतात अन् पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतात. साधना केल्यामुळे लिंगदेह हलका होतो आणि पटकन वर जातो. साधना न करणार्या व्यक्तींचा लिंगदेह जड असल्यामुळे तो अडकतो; म्हणून आपण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करायचा. त्यामुळे आपल्या अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते.
हे सर्व ऐकतांना मला गुरुदेवांची आठवण होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. अपालाने काही दिवसांपूर्वी मला जिज्ञासेने विचारले होते ‘‘आई, मृत्यूनंतर काय होते गं ?’’ तेव्हा मी हे सर्व अपालाला सांगितले होते. ते तिने योग्य वेळी आणि अभ्यासपूर्ण सांगितले, याचे मला कौतुक वाटले.
‘हे गुरुदेवा, प्रत्येक गोष्ट तुम्ही इतकी सोपी करून सांगितली आहे की, त्यामुळेच इतक्या लहान वयातही अपालाने ‘मृत्यूनंतर काय होते ?’, हे आजोबांना सहजतेने समजावले. यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.
२. कु. अपालाने मैत्रिणीला ‘कोणते संगीत ऐकावे ?’, हे सांगून मार्गदर्शनासाठी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ची ध्वनीचित्रचकती पहाण्यास सांगणे
एकदा अपालाच्या मैत्रिणीने तिला भ्रमणभाषवर एक चलचित्र पाठवले. ते चलचित्र पाश्चात्त्य असून ‘ख्रिश्चन धर्मियांमध्ये शवयात्रेच्या वेळी कसे नृत्य केले जाते ?’, याविषयी होते. ते पाहून अपालाने तिला लघुसंदेश केला, ‘अगं, मी सांगते त्याचा अपसमज करून घेऊ नकोस; पण तू अशी चलचित्रे बघू नकोस. त्यातून चांगली स्पंदने येत नाहीत. त्याचा तुलाच त्रास होईल.’ त्यानंतर अपालाने तिच्या मैत्रिणीला ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ची ‘कोणते संगीत ऐकावे आणि संगीताचे आपल्यावर होणारे परिणाम’ या विषयाची ‘लिंक’ पाठवली आणि ती पहाण्यास सांगितली.
या सर्व प्रसंगातून मला अपालाची सात्त्विक विचारसरणी आणि ‘इतरांचा विचार करणे’, हा गुण शिकायला मिळाला.
‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेने अपाला अभ्यासपूर्ण विषय सांगू शकली. यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (१२.७.२०२०)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |