राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आला आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना
भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागुल यांचा शिवसेनेत प्रवेश
नाशिक – राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आला आहे. राज्यपाल नियुक्त आमदार न होऊ देणारे घटनेचे मारेकरी आहेत. राज्यपालांनी घटनेचा खून करू नये, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. ८ जानेवारी या दिवशी संजय राऊत यांच्या उपस्थितीत येथील भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की,
१. विधान परिषदेच्या १२ जागा राज्यपाल कसे रिकाम्या ठेवू शकतात ? आज १० मास होत आले. घटनात्मक पदावर बसून तुम्ही घटनेचे मारेकरी म्हणून काम करता का ? तुम्हाला अभ्यास करायला किती वेळ लागतो ?
२. जोपर्यंत हे सरकार पाडले जात नाही आणि माझ्या मनासारखे सरकार येत नाही, तोपर्यंत मी राज्यपाल नियुक्त शिफारसीवर स्वाक्षरी करणार नाही, असा आदेश राज्यपालांना आला आहे का ? हे राज्यपालांनी स्पष्ट केले पाहिजे; मात्र १२ सदस्यांच्या नियुक्त्या न होणे हा विधिमंडळ आणि महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा अवमान आहे.
३. औरंगाबाद विमानतळ नाव पालण्याचा ठराव मंत्रिमंडळाने संमत करून केंद्र शासनाला पाठवला. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे विमानतळ हा प्रस्ताव सरकारने दिला आहे. काँग्रेस मनातून संभाजीनगर नावाला सकारात्मक आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करावे, अशी मागणी आहे. यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.
४. माझ्यावर कोणताही घाव, वार, आक्रमण यांचा परिणाम होत नाही. ईडीची नोटीस म्हणजे सरकारी कागद आहे. आम्ही तलवार उपसली, तर अनेकांना पळापळ करावी लागेल, हे ईडी आणी सीबीआय मागे लावणार्यांनी लक्षात ठेवावे, अशी चेतावणी त्यांनी दिली.
५. देहली येथील आंदोलनात शेतकर्यांचे मृत्यू झाले. हे केंद्र सरकारने केलेले खून आहेत. राज्यात होणार्या शेतकरी आत्महत्यांवर लवकरच तोडगा निघेल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप बिनबुडाचे असून किरीट सोमय्या यांचा जन्म आरोपातून झाला आहे.