कळंबा कारागृहातून पुन्हा २ भ्रमणभाष, सीमकार्ड जप्त; ‘मकोका’तील ५ जणांवर गुन्हा नोंद
अपप्रकार रोखण्यात वारंवार अपयशी ठरणारी कुचकामी प्रशासकीय यंत्रणा !
कोल्हापूर – कळंबा मध्यवर्ती कारागृहात ‘मकोका’अंतर्गत कारवाई केलेल्या ५ संशयितांकडून २ भ्रमणभाष, सीमकार्ड, तसेच दोन बॅटर्या जप्त करण्यात आल्या. कारागृह प्रशासनाने ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने घेतलेल्या झडतीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संशयितांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. विकास रामअवतार खंडेलवाल, अभिमान विठ्ठल माने, शुक्रराज पांडुरंग घाडगे, अक्षय अशोक गिरी, युवराज मोहन महाडिक अशी त्या संशयितांची नावे आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, कळंबा कारागृहात गेल्या १५ दिवसांत १० भ्रमणभाषसह गांजा सापडला आहे. याची गंभीर नोंद कारागृह प्रशासनाने घेतली आहे. चंद्रमणी इंदूरकर यांनी अधीक्षकपदाची सूत्रे घेतल्यावर कारागृहाची वारंवार झडती घेण्यास प्रारंभ केला. या झडतीत वरील प्रकार उघडकीस आला. या अगोदर चार्जर, वायर, पेनड्राईव्ह मिळाले होते. (ज्या ठिकाणी गुन्हेगारी वृत्तीत पालट व्हावा म्हणून शिक्षेसाठी गुन्हेगारांना ठेवले जाते त्या ठिकाणीच जर भ्रमणभाष, चार्जर, पेनड्राईव्ह अशा गोष्टी सापडत असतील आणि त्याही वारंवार, तर कारागृह यंत्रणा किती कुचकामी आहे, हेच यातून सिद्ध होते. यामुळे कारागृहातील बंदीवान आणि कारागृह प्रशासन यांच्यात काही साटेलोटे, तर नाही ना ? अशी शंका नागरिकांच्या मनात उत्पन्न झाल्यास गैर ते काय ? – संपादक)
(सौजन्य ः ZEE २४ तास)