सीमालढ्यात मराठी माणसांची एकजूट दाखवूया ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
सीमा भागातील मराठी महिला संपादकांना शासनाच्या अधिस्वीकृती पत्रिकेचे वितरण
मुंबई/कोल्हापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवूया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एकेक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे पावले टाकेल. त्यासाठी सर्वपक्षियांची, सर्व नेत्यांची एकजूट करूया. सीमावासियांचा आक्रोश राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोचवण्यासाठी प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत देण्यात येणारी अधिस्वीकृती पत्रिका पहिल्यांदाच सीमा भागातील मराठी वृत्तपत्रांच्या दोन महिला संपादकाना संमत करण्यात आली आहे. या पत्रिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेळगाव जिल्ह्यातील दैनिक वार्ताच्या संपादक श्रीमती क्रांती सुहास हुद्दार आणि दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक श्रीमती बबिता राजेंद्र पोवार यांना वितरण करण्यात आले. वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम घेण्यात आला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या भागातील अन्यायाचा टाहो राज्यातील अन्य भागांत पोहचविण्याची गरज आहे. गेली ६४ वर्षे हा लढा चालू आहे. या भागातील मराठी भाषिकांचा लोकांचा टाहो राज्याच्या अन्य जिल्ह्यात पोचविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. त्यामुळे सीमावासीय अन्यायाच्या विरोधात जे-जे पाऊल टाकतील, त्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल. कर्नाटक सरकार सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असतानाही एक-एक पाऊल टाकून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत आहे.
मराठी भाषामंत्री श्री. सुभाष देसाई म्हणाले, मराठी भाषा विभागाच्या वतीने सीमा भागातील मराठी शाळांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सीमा भागात मराठी भाषा विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाने कार्यक्रमाचे संयोजन केले होते. कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.
सीमा लढ्याचा मला वारसा ! – मुख्यमंत्रीसीमा लढा माझ्या अंत:करणाच्या जवळचा विषय आहे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून सीमा लढ्याचा वसा आणि वारसा मला मिळाला आहे. या लढ्याशी आपले नाते आणि ऋणानुबंध दोन पिढ्यांचे आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. |