राजकारण करण्यासाठी शेळ-मेळावली प्रश्नाचे भांडवल ! – नितीन फळदेसाई, अध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच
पणजी, ७ जानेवारी (वार्ता.) – भारतीय जनता पक्षातील मंत्री आणि आमदार आपापसांत भांडत आहेत. शेळ-मेळावली आयआयटी प्रकल्प याचे ज्वलंत उदाहरण आहे. या प्रकल्पात काहीही अडचण नाही, तर हे निवळ राजकारण आहे. लोकांना चिथावायचे आणि आपली पोळी शेकून घ्यायची, असा प्रयत्न चालू आहे. हा प्रकल्प आणि येथील समस्या या संदर्भातील सत्य बाहेर येण्यासाठी सरकारने निष्पक्ष स्वतंत्र आयोग नेमावा, अशी मागणी गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.
शेळ-मेळावली येथे मुळात समस्याच नाही. सोडवायचाच असल्यास चुटकीसरशी सुटणारा हा प्रश्न आहे; मात्र राजकारण करण्यासाठी या प्रश्नाचे भांडवल करण्यात येत असल्याचा आरोप श्री. फळदेसाई यांनी केला. २ राजकारण्यांमधील वादामुळे हे प्रकरण वाढले आहे. राजकीय नेत्यांनी लोकांच्या प्रश्नांऐवजी स्वार्थास महत्त्व दिल्याने हा प्रश्न चिघळला आहे. राजकारण्यांचा वरदहस्त लाभल्यामुळे हे प्रकरण हाताबाहेर जाण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी गोमंतकीय जनता संभ्रमात पडली आहे. जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याने यावर एक स्वतंत्र आयोग नेमावा, अशी मागणी श्री. फळदेसाई यांनी केली.