शेतकर्यांच्या लाभाच्या विधेयकाला राजकारणासाठी विरोध केला जात आहे ! – भाजप नेत्यांचे प्रतिपादन
कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा कणकवलीत ‘ट्रॅक्टर मोर्चा’
कणकवली – केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे भाजपच्या वतीने या विधेयकाच्या समर्थनार्थ ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्च्यात भाजप कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शहरातील मुडे डोंगरी येथून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा ‘ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्यात आला. मोच्यार्र्ची सांगता झाल्यानंतर सभा घेण्यात आली. या वेळी उपस्थित नेत्यांनी त्यांचे विचार मांडले.
शेतकर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधक राजकारण करत आहेत ! – डॉ. अनिल बोंडे
कोरोनाच्या काळात शेतकर्यांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावरले. राज्य सरकारने एक रुपयाही दिला नाही. पंतप्रधान किसान योजनेतून शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा केले. कृषी विधेयकातून शेतकर्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हे विधेयक व्हावे, असे खासदार राहुल गांधी यांनीच सांगितले होते; मात्र आता ते शेतकर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहेत.
दलालांच्या विळख्यातून शेतकर्यांची सुटका ! – नारायण राणे, खासदार
गेल्या ७० वर्षांत शेतकर्यांच्या भल्यासाठी काँग्रेसला जे करता आले नाही, ते पंतप्रधान मोदी यांनी करून दाखवले आहे. जुन्या कायद्यांमुळे शेतकर्यांची कोंडी होत होती. दलालांच्या माध्यमातून त्यांना माल विकावा लागत होता. जुने कायदे मोदी यांनी मोडीत काढले. त्यामुळे काँग्रेसची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे विरोधासाठी विरोध होत आहे.