(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘बाबरी’सारखे वातावरण निर्माण करत आहेत !’

आतंकवादाशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा कांगावा !

शंखवाळी तीर्थक्षेत्री पूजाअर्चा आणि नामस्मरण केल्याचे प्रकरण

वास्को, ७ जानेवारी (वार्ता.) – सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी) ३० डिसेंबर या दिवशी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजाअर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम चालू असतांना स्थानिक ख्रिस्त्यांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही चर्चची भूमी असल्याचा दावा करून पोलिसांवर दबाव आणत भक्तांचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद पाडला. या प्रकरणी सांकवाळ येथील ‘पॅरिशनर्स’ (चर्चचे सदस्य) आणि कुठ्ठाळीच्या भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा  ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे धार्मिक कार्यक्रम करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी शासनावर दबाव आणत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आतंकवादाशी संबंध असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने सांकवाळ प्रकरणी काही हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘बाबरी’ सारखे वातावरण निर्माण करत असल्याचे म्हटले आहे. (बाबरीप्रमाणेच देशात ज्या ठिकाणी हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी आणि चर्च उभारण्यात आले आहेत, तेथे पुन्हा मंदिरे उभारणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेस शासनाने स्वातंत्र्यानंतर ‘प्लेसीस ऑफ वर्शिप’ या नावाने केलेला कायदा रहित करायला हवा, अशी हिंदूंची मागणी आहे ! – संपादक)

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ पत्रकात पुढे म्हणते,

१. ‘‘बाबरी मशीद प्रकरणी सांकवाळ प्रमाणेच क्लृप्ती लढवण्यात आली आणि यामुळे बाबरी अनधिकृतपणे पाडण्यात आली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने श्रद्धेच्या आधारे याला पाठिंबा देणारा निर्णय दिला. (हा खोटारडेपणा आहे. बाबरी ढाच्याच्या ठिकाणी पुरातत्व विभागाने खोदकाम केले असता तेथे पूर्वीच्या मंदिराचे अवशेष सापडले. याला पुरातत्व विभागाचे अधिकारी महंमद यांनीच पुष्टी दिली आहे, तसेच ज्या बाबराने हिंदूंच्या हत्या केल्या, मंदिरे पाडली, त्या बाबराची मशीद असली, तरी ती भारतात ठेवून कोणता आदर्श जनतेसमोर ठेवायचा ? त्यापेक्षा तेथे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे मंदिरच योग्य ! – संपादक)

२. गोव्यात सर्व धर्मांचे लोक एकोप्याने रहातात; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटना अल्पसंख्यांकांच्या विरोधात वक्तव्ये करून गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफ्आय) केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करते, केरळमधील ख्रिस्ती आणि हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’द्वारे फसवून आखाती देशात विकते, हे गोमंतकियांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी गोमंतकियांना धार्मिक सलोखा शिकवण्याचा प्रयत्न करू नये ! पीएफ्आय सारख्या संघटनांमुळे गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडत आहे ! – संपादक)

३. पोलिसांनी सांकवाळ प्रकरणी धार्मिक कार्यक्रम करणार्‍यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करावा.’’