संतांनी केलेल्या आणि सांगितलेल्या विविध प्रार्थना, तसेच साधकांनी करावयाच्या प्रार्थना
विविध प्रार्थना
संतांनी केलेल्या आणि सांगितलेल्या प्रार्थना
१. शंकराचार्यांनी परमेश्वराला केलेली प्रार्थना (ज्ञानयोगानुसार)
‘हे परमेश्वरा, माझ्यातील उद्धटपणा दूर कर. माझ्या मनाचे दमन कर. माझी विषयमृगतृष्णा शांत कर. माझ्या ठिकाणी भूतदयेचा विस्तार कर आणि मला संसारसागरातून पैलतिरी ने.’
२. पू. सारदादेवी (श्रीरामकृष्ण परमहंसांच्या पत्नी) चंद्राला पुढील प्रार्थना करत असत
‘हे चंद्रा, तुझे अंतःकरण जसे शीतल आहे, तसे माझे अंतःकरण शीतल ठेव. तू जसा पवित्र आणि निर्मळ आहेस, तसे मला पवित्र आणि निर्मळ ठेव.’
३. सनातनचे संत पू. सत्यवान कदम यांनी सांगितलेली प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, तुझी भक्ती माझ्या चित्तात दृढ होऊ दे. तुझे नाम माझ्या चित्तात रुजू होऊ दे. माझ्या साधनेतील अडथळे दूर होऊ दे. तुझ्या प्राप्तीची तीव्र तळमळ तूच माझ्यात निर्माण कर.’
साधकांनी करावयाच्या प्रार्थना
१. स्वयंसूचना घेण्यापूर्वी करायची प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, या सूचनेतील प्रत्येक शब्द तुझ्या चैतन्याने भारित होऊ दे. ही चैतन्यमय शक्ती माझ्या अंतःकरणापर्यंत पोचून माझ्यातील आळस आणि मनाप्रमाणे करणे (स्वतःचे जे दोष आहेत, ते येथे म्हणावेत) हे दोष दूर होऊ दे अन् तत्परता आणि विचारून करणे (स्वतःला अपेक्षित असलेले गुण येथे म्हणावेत.) हे गुण वाढू दे.
२. सेवा करत असतांना करायची प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, मी करत असलेल्या सेवेतील स्थुलातील आणि सूक्ष्मातील अडथळे दूर होऊ दे.’
३. रात्री झोपतांना करायची प्रार्थना
‘हे श्रीकृष्णा, झोपतांना तुझे नाम माझ्या मुखात असू दे. झोपेतही माझा अखंड नामजप चालू राहू दे. तसेच झोपेतून उठल्यावरही दिवसाचा आरंभ तुझ्या स्मरणानेच होऊ दे. अशा प्रकारे हे भगवंता, मला सतत तुझ्या अनुसंधानात ठेव.’
– सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.३.२०१६)
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |