वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या स्मरणिकेची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे
१. विज्ञापने आणणे, त्यांची संरचना आणि तपासणी करणे अन् ती छपाईसाठी पाठवणे यांच्या समन्वयाची सेवा करतांना जाणवलेली सूत्रे
‘वर्ष २०१९ गुरुपौर्णिमेच्या वेळी स्मरणिकेची सेवा पुष्कळ भावपूर्ण झाली. त्या वेळी ‘सर्व सेवा सहजतेने कशा पार पडल्या ?’, ते समजलेही नाही. माझ्याकडे गुरुपौर्णिमेसाठी विज्ञापने घेण्यापासून ती विज्ञापने आल्यानंतर संरचना आणि तपासणी पूर्ण करून छपाईसाठी पाठवणे या सेवांचा समन्वय पहाण्याची सेवा होती. ही सेवा करतांना संरचना करण्यासाठी साधकसंख्या अल्प असल्याने आम्हाला अडचणी येत होत्या; पण त्या वेळी कोणत्याही प्रतिक्रिया न येता माझे मन स्थिर होते. आवश्यक तेव्हा साधकांचे साहाय्यही मिळत होते. प्रसारातल्या साधकांनीही येऊन विज्ञापने पडताळण्याची सेवा वेळेत केली, तसेच स्मरणिका छपाईसाठी पाठवल्यावर तिथल्या साधकांनी लक्ष देऊन छपाई चांगली होण्यासाठी प्रयत्न केले. सौ. स्नेहा नाडकर्णी यांनी स्मरणिकेच्या लेखा संबंधीची सेवा भावपूर्ण केली. ‘स्मरणिका छपाई करून आणल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना दाखवल्यावर त्यांनी स्मरणिका चांगली झाली’, असे सांगितले.
२. प.पू. डॉक्टरांनी स्मरणिका पाहिल्यावर ‘स्मरणिका भावपूर्ण झाल्याचे सांगून हातात धरल्यावर भरून येते’, असे सांगणे आणि दोन वेगवेगळ्या पृष्ठसंख्या असलेल्या स्मरणिका हातात घेतल्यावर ‘अधिक पृष्ठसंख्या असलेल्या स्मरणिकेकडे पाहून अधिक चैतन्य जाणवत आहे’, असे लक्षात येणे
स्मरणिका प.पू. डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी स्मरणिका भावपूर्ण झाल्याचे सांगितले. ‘‘स्मरणिका हातात धरल्यावर भरून येते’’, असेही ते म्हणाले. नंतर गुरुदेवांनी मला दोन वेगवेगळ्या पृष्ठसंख्या असलेल्या स्मरणिका दिल्या आणि ‘त्यांतून काय जाणवते ?’, हे पहायला सांगितले. मला अधिक पृष्ठसंख्या असलेल्या स्मरणिकेतून अधिक चैतन्य जाणवले. त्यानंतर ‘चार स्मरणिकांपैकी सर्वांत अधिक पृष्ठसंख्या (२४० पृष्ठे) आणि सर्वांत अल्प पृष्ठसंख्या (१५२ पृष्ठे) असलेल्या स्मरणिकांकडे बघून काय वाटते ?’ ते पहायला सांगितले. मला अधिक पृष्ठसंख्या (२४० पृष्ठे) असलेल्या स्मरणिकेकडे पाहून अधिक चैतन्य जाणवले. हा प्रयोग केल्यानंतर त्यांनी प्रयोगासाठी त्या स्मरणिका संशोधन विभागाकडे देण्यास सांगितल्या.
३. अनुभूती
परात्पर गुरुदेवांकडे पहातांना त्यांच्या संपूर्ण अंगावर सोनेरी छटा दिसणे आणि त्यांच्या देहातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे
मी स्मरणिका घेऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. त्या वेळी मला त्यांच्या अंगावर पूर्ण सोनेरी छटा दिसत होती. ‘त्यांच्या देहातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.
त्यांनी स्मरणिकेची ही सेवा भावपूर्ण झाल्याचे सांगितल्यावर माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. गुरुदेवांनीच आमच्याकडून ही सेवा भावपूर्ण करून घेतली.’
– श्री. विवेक बा. पेंडसे, बोरी, फोंडा, गोवा.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |