प्रत्येकाला नामजप करायला सांगणार्या प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या प्रत्येक अवयवाला कान लावल्यावर नामजप ऐकू येणे
८.१.२०२१ या दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने…
‘एकदा साहित्यसम्राट न.चि. केळकर प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनास गेले होते. प.पू. महाराजांसमोर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, प.पू. महाराजांच्या दर्शनास येणार्या प्रत्येकाला ते नामाचा महिमा सांगून नामजप करायला सांगत; परंतु ते स्वतः मात्र कधी नाम घेतांना दिसले नाहीत. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी धाडस करून प.पू. महाराजांना विचारले, ‘‘महाराज, आपण इथे येणार्या प्रत्येकाला नाम घ्यायला सांगत आहात; परंतु स्वतः मात्र नाम घेतांना आम्हाला जाणवत नाही.’’
केळकरांच्या या प्रश्नावर प.पू. महाराजांनी स्मित केले आणि ते म्हणाले, ‘‘नरसोपंत, तुमची शंका रास्त आहे. या माझ्या हृदयाला कान लावा.’’ उत्सुकतेने केळकरांनी प.पू. महाराजांच्या हृदयाला कान लावला. अन् काय आश्चर्य ! त्यांना प.पू. महाराजांच्या हृदयमंदिरातून स्पष्टपणे नाम ऐकू आले, ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’
काही वेळानंतर प.पू. महाराज म्हणाले, ‘‘नरसोपंत, आता माझ्या या हाताला कान लावा.’’ केळकरांनी त्याप्रमाणे केले, तेव्हा त्यांना प.पू. महाराजांच्या हातातूनही ‘रामनामाचा’ ध्वनी ऐकू आला. नंतर प.पू. महाराजांच्या म्हणण्यानुसार केळकरांनी अशा प्रकारे प.पू. महाराजांचे पाय, गुडघे, बोटे इत्यादी अवयवांना कान लावला. प्रत्येक जागी रामनामच ऐकू येत होते. प.पू. महाराजांच्या रोमरोमातून रामनाम ऐकू आल्यावर केळकरांनी प.पू. महाराजांना साष्टांग दंडवत घातला.’
– श्री. मुरलीधर का. वानखेडे, नांदुरा
(शक्तिब्रह्माश्रम समाचार, जुलै २००९, पृ. २४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |