राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील आधुनिक वैद्य ११ जानेवारीला संपावर जाणार
संप म्हणजे राष्ट्रीय संपत्तीची हानीच होय, हे लक्षात घेऊन संप पुकारणार्यांनी त्यांच्या मागण्या वैध मार्गाने पूर्ण होतील, यासाठी प्रयत्न करावेत !
मुंबई – राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील सर्व वैद्यकीय अधिकारी अर्थात आधुनिक वैद्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करून घ्यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, अस्थायी सेवेतील वैद्यकीय अधिकार्यांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी मागील कित्येक दिवसांपासून आंदोलन करत आहेत; पण त्याकडे सरकार कानाडोळा करत आहे. त्यामुळे आता या आधुनिक वैद्यांनी ११ जानेवारी या दिवशी लाक्षणिक संप करण्याची चेतावणी दिली आहे. त्यानुसार राज्यातील शेकडो वैद्यकीय अधिकारी आणि आधुनिक वैद्य संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील १८ महाविद्यालये आणि रुग्णालये यांतील वैद्यकीय अधिकारी १ जानेवारीपासून काळ्या फिती लावून काम करत आहेत. हे आंदोलन ६ जानेवारीच्या रात्रीपर्यंत चालू रहाणार आहे.