कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर – येथील पत्रकारांची शिखर संस्था असणार्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने ६ जानेवारी या दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. उदय कुलकर्णी यांनीे मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांचे कोरोना अनलॉक नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या विक्रीतून जो काही निधी उभा राहिला आहे, तो सर्व गरजू पत्रकारांना देण्यात येणार आहे. ही रक्कम पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर प्रेस क्लब आणि सावली केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांच्या आरोग्याची पडताळणी करून घेतली. या वेळी सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने सावली केअर सेंटरच्या डॉ. राजकुमारी नायडू, ब्रिजेश रावळ, राजन देशपांडे, किशोर देशपांडे यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास कोल्हापूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विजय केसरकर, कार्याध्यक्ष उद्धव गोडसे, संचालक राजेंद्र मकोटे, सदाशिव जाधव, श्रद्धा जोगळेकर, डॅनियल काळे, शुभांगी तावरे, संजय देसाई यांच्यासह पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते.