अमेरिकेतील संसदेमधील हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू

  • ट्रम्प समर्थकांकडून सत्ता हस्तांतराला प्रचंड विरोध

  • ५२ जणांना अटक

  • बलाढ्य अमेरिकेच्या गेल्या २२० वर्षांच्या लोकशाहीला लागलेला हा मोठा डाग आहे. हा हिंसाचार हुकूमशाहीचे दर्शक आहे. याचे अमेरिकेतील नागरिक समर्थन करणार नाहीत, ही अपेक्षा !
  • जगातील बलाढ्य महासत्ता असणार्‍या अमेरिकेत असे घडते, हे लज्जास्पद ! इतर वेळी लोकशाही, मानवाधिकार आदी सूत्रांवरून भारताला सुनवणार्‍या अमेरिकेने स्वतःच्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीची मूल्ये रूजवणे किती आवश्यक आहे, हे यातून दिसून येते !
ट्रम्प समर्थक सहस्रोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते

वॉशिंग्टन (अमेरिका) – येथील अमेरिकेच्या संसदेच्या म्हणजे कॅपिटल इमारतीमध्ये आणि इमारतीबाहेर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहस्रो समर्थकांनी जवळपास ४ घंटे हिंसाचार घडवला. या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ५२ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी ४ घंट्यांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.

१. ट्रम्प समर्थक सहस्रोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेची बैठक चालू असतांनाच ट्रम्प समर्थकांनी इमारतीमध्ये घुसखोरी करून गोंधळ घालत हिंसाचार करण्यास प्रारंभ केला. परिणामी संसदेचे कामकाज थांबवावे लागले.

२. या वेळी पोलिसांसमवेत झालेल्या झटापटीत ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका समर्थक महिलेचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला. मृतांमध्ये अजून एक महिला आणि २ पुरुष आंदोलक आहेत.

. या परिसरात संचारबंदी असतांनाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि कॅपिटलमधील हिंसाचार केल्याप्रकरणी ५२ जणांना अटक करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटर आणि फेसबूक खाती काही घंट्यांसाठी बंद !

या हिंसाचारांनंतर ट्विटरने ट्रम्प यांचे खाते १२ घंट्यांसाठी, तर फेसबूकने २४ घंट्यांसाठी बंद केले आहे. हिंसाचार चालू असतांनाच ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडीविषयी केलेल्या निराधार आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली. नागरी अखंडत्वाविषयी नियम मोडणारे ३ ट्वीट्स डिलीट न केल्यास ट्रम्प यांच्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची चेतावणी ट्विटरने दिली.

हा विरोध नव्हे, देशद्रोह ! – जो बायडेन

हा विरोध नसून देशद्रोह आहे. कायदा न मानणार्‍यांची छोटी नगण्य आहे. हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे, असे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले.

अमेरिकेसाठी लज्जास्पद आणि अपमानजनक ! – माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा

ही घटना आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानजनक आहे; मात्र ही हिंसा अचानक घडलेली नसून ही चीड अनेक वर्षांपासून खदखदत होती आणि आता ती हिंसेच्या रूपात पहायला मिळत आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या हिंसाचाराचा निषेध केला.

हिंसाचाराचे वृत्त पाहून अस्वस्थ झालो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांनी या घटनेवर ट्वीट करत म्हटले की, वॉशिंग्टन डी.सी.मधील दंगल आणि हिंसाचार यांच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो आहे. सत्तेच्या हस्तांतराची प्रक्रिया ही व्यवस्थित आणि शांततेत चालूच राहिली पाहिजे. अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने निषेध करून लोकशाही प्रक्रियेला डाग लागू दिला जाऊ शकत नाही.


(सौजन्य : Zee News)