वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे कर्तव्य बजावत होतो ! – ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित
आवश्यक त्या अनुमतीविनाच कारवाई केल्याचा आरोप
नाशिक – वर्ष २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट कटाच्या बैठकीला उपस्थित राहून मी माझे कर्तव्य बजावत होतो, असा युक्तीवाद या प्रकरणातील ले. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपिठासमोर पुरोहित यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.
(सौजन्य : टाईम्स नाऊ फेसबुक)
या वेळी सैन्याने सोपवलेल्या दायित्वाचा भाग म्हणून पुरोहित हे कटाच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांच्यावर माहिती गोळा करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आवश्यक ती अनुमती घेणे आवश्यक होते, असा युक्तीवादही पुरोहित यांनी केला. ‘आवश्यक त्या अनुमतीविना माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे’, असा आरोप करत ‘मला या प्रकरणातून दोषमुक्त करावे’, या मागणीसाठी पुरोहित यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. ‘कर्तव्य म्हणून बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही मला कारागृहात टाकले गेले आणि आतंकवादी असल्याचा ठपका ठेवून छळवणूक करण्यात आली’, असा आरोप पुरोहित यांनी केला आहे.