मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ऊस उत्पादकांचे आंदोलन मागे
सांगे, ६ जानेवारी (वार्ता.) – ऊस उत्पादकांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी दिल्याने उस उत्पादकांनी त्यांचे चालू असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक गेले ५ दिवस सांगे येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते.
ऊस उत्पादक म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी ऊस उत्पादकांना प्रतिटन ३ सहस्र ६०० रुपये भरपाई देण्याचे मान्य केले आहे. मागील ८ वर्षांतील सर्वाधिक उत्पादनाच्या आधारावर भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले आहे. फेब्रुवारी मासाच्या अखेरपर्यंत भरपाई देण्यात येणार आहे. हे आश्वासन शासन पुढील ३ ते ४ दिवसांत लेखी स्वरूपात देणार आहे.’’