पिंपरी महापालिकेच्या १ सहस्र ३०० मिळकतींचा अवैध वापर; कोट्यवधींची हानी – माजी खासदार गजानन बाबर
दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाईची मागणी
पिंपरी – महापालिकेचे व्यापारी गाळे, भाजी मंडईचे गाळे आदी मिळून पालिकेच्या मालकीच्या जवळपास १ सहस्र ३६९ मिळकतींचा अवैध वापर होत असून पालिकेची २ वर्षांत ३ कोटींची हानी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. या मिळकतींचे करार संपले, तरी भाडेकरूंनी त्याचा ताबाच सोडलेला नाही. माजी खासदार गजानन बाबर यांनी माहितीच्या अधिकारात याविषयीची माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात याची सविस्तर माहिती बाबर यांना देण्यात आली आहे.
त्यानुसार महापालिकेने शासकीय कार्यालयांसाठी ६९ इमारती दिल्या असून पी.एम्.पी.साठी ६ आणि मेट्रोसाठी १० जागा देण्यात आल्या आहेत. यांपैकी १४५ व्यापारी गाळे आणि १ सहस्र २२४ भाजी मंडईचे गाळे मिळून १ सहस्र ३६९ मिळकतींचा करार संपलेला आहे. त्याचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यावर करारनामा संपलेल्या ७५० मिळकती असतील, त्यापेक्षा अधिक नाहीत. पालिकेची आर्थिक हानी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या गाळेधारकाकडे तथा भाजी मंडईधारकाकडे थकबाकी आहे, ती वसूल करण्याचे काम चालू आहे. नियमानुसार अपेक्षित कार्यवाही केली जाईल, असे भूमी-जिंदगी विभागचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांनी सांगितले.