बलात्कार्यांना शिक्षा !
जे कधीतरी व्हायचेच होते, ते तमिळनाडूमध्ये झाले आहे. थिरूवेल्लूर (तमिळनाडू) येथे एका १९ वर्षीय तरुणीने तिच्यावर होणार्या अतीप्रसंगाचा प्रतिकार करतांना नराधमाला धडा शिकवला आहे. चाकूचे भय दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्या २४ वर्षीय तरुणाच्याच चाकूने तिने त्याच्यावर वार केले. स्वरक्षणार्थ प्रतिकार करतांना नो नराधम जागीच ठार झाला. गेल्या २ दशकांत महिलांवरील अत्याचारांत झालेली प्रचंड वाढ आणि त्याविषयी पोलीस अन् प्रशासन यांच्या अन्वेषणातील पोकळ दिखावा पहाता या स्थितीला आपण कधीतरी जाणारच होतो. दिवसाउजेडीही महिलांवरील अत्याचारांनी टोक गाठले असतांना सायंकाळी अथवा रात्रीच्या वेळी युवतींनी घराबाहेर पडणे तर कठीणच झाले आहे.
बलात्कार, विनयभंग आदी गुन्ह्यांत कठोर शिक्षांचे प्रावधान आहे. अन्य देशांतही इंडोनेशियामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून इंजेक्शनद्वारे एक औषध देऊन तारुण्यसुलभ भावना उत्पन्न करणार्या पेशींना नष्ट केले जाते. सौदी अरेबियामध्येही मृत्यूदंडाची किंवा गुप्तांग कापण्याची शिक्षा दिली जाते. झेक रिपब्लिक, नायजेरिया आदी देशांत औषधांद्वारे बलात्कार्याला नपुंसक बनवले जाते. चीनमध्ये बलात्कार झाल्याचे वैद्यकीय चाचण्यांतून स्पष्ट झाल्यानंतर कोणताही खटला चालू नसतांना बलात्कार्याला फासावर लटकवले जाते. भारतात मात्र बलात्कार्यांना कारावासाची शिक्षा सुनावली जाते. फार अल्प प्रकरणांत अत्यंत भीषण विटंबना झाली असेल, तरच आपल्याकडे फाशी दिली जाते. देहलीतील बहुचर्चित निर्भया बलात्कार प्रकरणातील बलात्कार्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यातही एक आरोपी अल्पवयीन असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आले. विदेशातील कायदे पहाता भारतातील शिक्षा तुलनेने सौम्यच म्हणाव्या लागतील. नपुंसक बनवणे या शिक्षेला मानवाधिकारवाल्यांचा विरोध आहे; मात्र वृत्ती पालटत नसेल, तर किती जिवांचा बळी जाण्याची वाट पहाणार ?
युवतींना आत्मनिर्भर करणे आवश्यक !
मुळात कायद्याने कठोर प्रावधान करणे, हा शेवटचा पर्याय आहे. अशा प्रकरणांत पोलीस तक्रारच होणे कठीण असते. अपवादात्मक स्थितीत तक्रार झालीच, तरी खटला न्यायालयात उभा रहाणे, गुन्हेगारावरील गुन्हा सिद्ध होणे आणि गुन्हेगाराला कठोर शिक्षा होणे, ही प्रक्रिया प्रचंड वेळकाढू आहे. एवढे झाले, तरी ती महिला आयुष्यातून उद्ध्वस्त होते, ती कायमचीच ! कायद्याने कितीही कठोर शिक्षार केली, तरी त्याचा पीडितेचे आयुष्य सावरण्यासाठी काय लाभ होतो ? याउलट वेळीच प्रतिकार केला, तर शीलरक्षणासह पुढील मनस्तापही टळतो. त्यामुळेच कायदे अधिकाधिक कठोर करण्यासह महिला आणि समाज सक्षम करणे, हाच प्रभावी उपाय आहे.
तमिळनाडूतील युवतीकडून प्रतिकार झाल्यामुळे झालेल्या हत्येचे कोणतेही समर्थन नसले, तरी तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःपेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी २ हात करण्याचे धैर्य दाखवले आहे. स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगामुळे घाबरून न जाता तिने त्याच्याच चाकूने त्याच्यावर वार केले आहेत. हे करण्यासाठी प्रचंड मनोबळ लागते. ते तिच्याकडे होते; म्हणून ती वाचली. ही युवती कुणा मित्रासमवेत फिरण्यासाठी, पार्टीसाठी, नव्हे, तर रात्री शौचाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्या वेळी घराबाहेर पडणे, ही तिची अपरिहार्यता होती. रात्रीच्या वेळी एकटीने आणि वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने शीलरक्षणासाठी हे धाडस केले आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातही आईसमवेत घराच्या ओसरीवर झोपलेल्या ३ वर्षीय बालिकेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. महिलांनी स्वरक्षणार्थ केलेला प्रतिकार, हा गुन्हा ठरू शकत नाही. त्यामुळे या युवतीने घाबरण्याचे कारण नाही; उलट यातून जो संदेश समाजाला दिला गेला आहे, तो आवश्यक होता. अशा प्रकारे युवती प्रतिकार करू लागल्या, तर बलात्कारांची संख्या निश्चितच घटेल. बलात्काराच्या घटना घडल्यानंतर ‘मेणबत्ती मोर्चे’ काढण्यापेक्षा तमिळनाडूतील युवतींचे सामूहिक सत्कार झाले पाहिजेत. तिच्या शौर्याचे अनुभवकथनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मागे म्हटले होते की, ‘स्वरक्षणासाठी मुलींच्या हातात शस्त्रे द्यावीत. त्यांचे खटले शिवसेना चालवेल.’ अशा सूचनांचा गांभीर्याने विचार करायला हवा. अर्थात् ते करतांना महिलांचे आत्मबळ वाढवण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. स्वरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण देतांना मनोबळ कसे वाढवावे, याचेही प्रशिक्षण दिले पाहिजे.
इस्रायलसारख्या देशांत शालेय शिक्षणातच सैनिकी शिक्षण दिले जाते. तेथील मुलीही प्रशिक्षित असतात. आपल्याकडे मात्र मुलांना लहान वयातच व्यावसायिक स्पर्धेत ढकलून आयुष्य जगण्याच्या कलांपासून वंचित ठेवले जाते. असा एखादा प्रसंग ओढवतो, तेव्हा तुमचे महाविद्यालयीन पांडित्य नव्हे, तर शारीरिक अन् मानसिक बळ कामी येत असते. दुर्दैव आहे की, ते वाढवण्यासाठी भारतात कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. आपण अनेक वेळा पहातो की, मुली संकटाची चाहूल लागल्यानंतरच गर्भगळीत होतात. परिस्थितीसमोर हात पत्करतात. तमिळनाडूसारख्या राज्यातील एका छोट्याशा गावातील १९ वर्षीय मुलीला जे करता येते, ते धाडस आतापर्यंत एकाही शहरी भागातील मुलीने दाखवलेले नाही. त्यांचे मनोबळ वाढेल, अशा प्रकारे कृतीकार्यक्रम हाती घेतले पाहिजेत.
बलात्कार या विकृतीचे मूळ समाज धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या अधःपतित होण्यात आहे. धर्माचे, नीतीमत्तेचे, चांगल्या-वाईटाचे शिक्षण शालेय शिक्षणातून दिल्यास, ते वृत्तीत येईपर्यंत पुन्हा पुन्हा सांगत राहिल्यास, बलात्कार – विनयभंग यांसारखे प्रकार घडणार नाहीत. भारत मुळात महिलांचा सन्मान करणारा देश आहे. महिलांच्या शीलरक्षणाची आमची परंपरा आहे. पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणापोटी, दूरचित्रवाहिन्यांच्या प्रभावाखाली राहिलेली आजची पिढी भरकटलेली असली, तरी आता तो काळ मागे पडत चालला आहे, हेच या प्रकरणातून दिसून येते.