विज्ञापनांद्वारे चमत्कारी किंवा अलौकिक शक्तींचा दावा करणार्या वस्तूंच्या विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाकडून बंदी
जादूटोणा कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्याचा आदेश
संभाजीनगर – विविध वाहिन्या आणि प्रसारमाध्यमे यांवर विज्ञापनांद्वारे चमत्कारी किंवा अलौकिक शक्तींचा दावा करणार्या वस्तूंच्या विक्रीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाकडून बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि प्रचार-प्रसार करणार्यांच्या विरोधात ‘अघोरी कृत्य आणि जादूटोणा कायद्यां’तर्गत गुन्हे नोंद करण्याचे, तसेच ‘याप्रकरणी कारवाई करण्यासाठी काय पावले उचललीत ?’, याची माहिती अहवालाद्वारे ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देश न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती एम्.जी. सेवलीकर यांच्या खंडपिठाने ५ जानेवारी या दिवशी दिले.
१. वर्ष २०१३ च्या जादूटोणा कायद्यानुसार अशा प्रकारचे विज्ञापन प्रसारमाध्यमांद्वारे प्रक्षेपित करण्यास मनाई आहे. त्यानुसार येथील राजेंद्र गणपतराव अंभोरे यांनी खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. याप्रकरणी राज्य शासनाच्या वतीने अधिवक्ता महेंद्र नेर्लीकर यांनी, तर केंद्र शासनाच्या वतीने डी.जी. नागोडे यांनी काम पाहिले. अशा वस्तू बनवणार्या प्रतिवादी आस्थापनाच्या वतीने अधिवक्ता सचिन सारडा उपस्थित होते.
The High Court directed the state government and Centre to create cells in Mumbai to see that no such advertisements are telecast on TV channels by separate advertisement or in the name of programmes in Maharashtrahttps://t.co/tlulUYc5SL
— The Indian Express (@IndianExpress) January 6, 2021
२. अंभोरे यांनी नंतर याचिका मागे घेण्याची विनंती खंडपिठाकडे केली; परंतु सामाजिक दृष्टीकोनातून याचिका महत्त्वाची असल्याने खंडपिठाने सुनावणी चालू ठेवली. त्यासाठी न्यायालयाचे मित्र म्हणून विधीज्ञ विजयकुमार सपकाळ यांची नियुक्ती केली. ‘अंधश्रद्धा पसरवणार्या विज्ञापनांचे प्रक्षेपण रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने मुंबई येथे ‘सेल’ स्थापन करून मासाभरात अधिकारी नेमावा’, असाही आदेश खंडपिठाने दिला आहे.