सनातनच्या ८६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९१ वर्षे) यांची सेवा करतांना कु. गुलाबी धुरी यांना आलेल्या अनुभूती
१. पू. आजींना १ दिवस अंघोळ घातलेली नसूनही त्यांच्या शरिराला चंदनाचा सुगंध येणे
‘एकदा पू. माईणकरआजींना पुष्कळ थकवा होता; म्हणून मी १ दिवस त्यांना अंघोळ घातली नाही. दुसर्या दिवशी ‘त्यांना अंघोळ घालायला हवी’, या विचाराने त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा त्यांच्या शरिराला चंदनाचा एवढा सुगंध येत होता की, ‘त्यांना अंघोळ घालायची आवश्यकताच नाही’, असे वाटले.
२. पू. आजींच्या खोलीचा दरवाजा उघडल्यावर पुष्कळ सुगंध येणे आणि ‘खोलीत पुष्कळ फुले आहेत’, असे वाटणे
पू. आजींच्या खोलीत साधिका सायंकाळी नामजपाला बसतात. मला पू. आजींची आठवण आली; म्हणून मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले. त्या वेळी दरवाजा उघडल्यावर मला पुष्कळ सुगंध आला आणि ‘खोलीत पुष्कळ फुले आहेत’, असे मला वाटले.
३. वडिलांचा गुडघा सुजल्याने त्यांची काळजी वाटणे आणि ‘त्यांनी काळजी घेण्यासाठी संत, परात्पर गुरुदेव आणि देव आहे’, याची जाणीव पू. आजींनी साधिकेला करून देणे
५.१०.२०२० या दिवशी दुपारी मी घरी भ्रमणभाष लावला होता. त्या वेळी ‘बाबांचा गुडघा सुजला आहे आणि तो पुष्कळ दुखत आहे’, असे मला समजले. तेव्हा रात्री झोपतांना माझ्या मनात विचार आला, ‘बाबांचा पाय सुजला आहे, तर शेतीची कामे कशी होणार ?’ त्या वेळी मला काळजी वाटली आणि मी प्रार्थना करून झोपले. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता मी पू. आजींना चहा द्यायला गेले. तेव्हा पू. आजींनी मला त्यांच्या बाजूला बसवले आणि आमच्यात पुढील संभाषण झाले.
पू. आजी : अगं गुलाबी, तुझे बाबा रात्री खोलीत आले होते.
मी : पू. आजी, माझे बाबा गावी आहेत. ते इथे कसे येतील ?
पू. आजी : मी तुझ्या बाबांना पाहिलेले नाही, तरी ते इकडे आले होते, हे नक्की.
मी : बाबा तुम्हाला काय म्हणाले ?
पू. आजी : ते म्हणाले, ‘आजी, रात्रीचे ३ वाजले, तरी तुम्ही का उठलात ? सर्व झोपले आहेत. तुम्हीपण झोपा.’
मी : मग तुम्ही काय म्हणालात ?
पू. आजी : मला रात्री झोप येत नव्हती; म्हणून मी जागी होते; पण तुझ्या बाबांनी ‘झोपा’ म्हणून सांगितले आणि मी शांत झोपले अन् मला छान झोप लागली.
मी पू. आजींच्या बोलण्याचे चिंतन केले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी बाबांची काळजी करत होते’, हे पू. आजींनी ओळखले. ‘बाबांची काळजी घेण्यासाठी संत, परात्पर गुरुदेव आणि देव आहे’, याची जाणीव त्यांनी मला या प्रसंगातून करून दिली. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
४. ‘पू. आजींच्या खोलीत पुष्कळ प्रकाश जाणवत आहे’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे
पू. आजींचा वाढदिवस होता; म्हणून रात्री १०.३० वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांना भेटायला आल्या होत्या. खोलीत आल्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘खोलीत पुष्कळ प्रकाश जाणवत आहे. ‘रात्र झाली नसून सूर्य उगवला आहे आणि दिवसाला आरंभ झाला आहे’, असे वाटते.’’
(ही अनुभूती मलाही पुष्कळ वेळा येते.)
५. पू. आजींच्या प्रत्येक अवयवातून चैतन्य बाहेर पडत आहे आणि मला आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे जाणवते.’
– कु. गुलाबी दीपक धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |