अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्याकडे सोपवावे ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्हे, उपसभापती, विधान परिषद
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण
बलात्काराचे आरोप असणारे पदाधिकारी असणारे पक्ष राज्य कसे चालवणार ?
मुंबई – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर नोंदवण्यात आलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याच्या प्रकरणी पोलीस ‘बी समरी’ अहवाल सादर करू शकतात. मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
संभाजीनगर येथील एका युवतीने मेहबूब शेख याने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मेहबूब शेख यांनी मात्र स्वत:वरील आरोप फेटाळून लावले असून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शेख यांची बाजू घेतली जात आहे.