विविध विषप्रयोगांद्वारे ३ वेळा ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा इस्रोच्या संशोधकाचा दावा
|
नवी देहली – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रोचे) वरिष्ठ सल्लागार आणि आघाडीचे संशोधक असणारे डॉ. तपन मिश्रा यांनी त्यांना गेल्या ३ वर्षांमध्ये ३ वेळा ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा केला आहे. मिश्रा यांनी सामाजिक माध्यमांतून पोस्ट प्रसारित करून याची माहिती दिली आहे. ‘अशा प्रकारचे आक्रमण हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आलेले गुप्त आक्रमण आहे’, असा दावाही मिश्रा यांनी केला. मिश्रा यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच ‘मला आणि माझ्या कुटुंबाला देशाने वाचवावे’, असेही त्यांनी म्हटले आहे. मिश्रा सध्या इस्रोमध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ते ३१ जानेवारीला निवृत्त होणार आहेत.
मिश्रा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की,
१. पहिल्यांदा २३ मे २०१७ या दिवशी बंगळुरूमधील मुख्यालयाविषयी माहिती देण्यासाठी माझी मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीनंतर दुपारच्या जेवणाच्या वेळी डोश्यासमवेतच्या चटणीमध्ये आर्सेनिक ट्रायऑक्साइड’ (एक प्रकारचे विषारी औषध) मिसळवण्यात आले होते. हे औषध वापरण्यामागे ते अधिक काळ माझ्या पोटात राहून शरिरात पसरून रक्ताच्या गुठळ्या निर्माण व्हाव्यात आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू व्हावा असा उद्देश होता; मात्र मला नाश्ता आवडला नाही. मी डोश्यासमवेत थोडी चटणी खाल्ली होती. त्यामुळेच याचा अधिक परिणाम झाला नाही; मात्र २ वर्षे यामुळे रक्तस्राव होण्याचा बराच त्रास झाला.
२. दुसरे आक्रमण ‘चंद्रयान-२’ या मोहिमेविषयी मोहिती घोषित करण्याच्या २ दिवस आधी झाला. १२ जुलै २०१९ या दिवशी ‘हायड्रोजन साइनाइड’च्या साहाय्याने मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र एन्.एस्.जी. (राष्ट्रीय सुरक्षारक्षक) अधिकार्याने वेळीच नोंद घेतल्याने जीव वाचला.
३. तिसर्यांदा सप्टेंबर २०२० मध्ये आर्सेनिक देऊन मला मारण्याचा प्रयत्न झाला. यानंतर मला श्वसनाच्या संदर्भातील गंभीर आजार, त्वचेच्या संदर्भातील आजार, न्यूरोलॉजिकल, तसेच फंगल इन्फेक्शन यांसंदर्भातील समस्या जाणवू लागल्या.
४. उच्च सुरक्षा यंत्रणा असणार्या माझ्या घरात सुरुंग खोदून विषारी साप सोडण्यात आले. या सापांपासून संरक्षण करण्यासाठी घरात दर १० फुटांवर कार्बोलिक अॅसिडच्या सुरक्षा जाळ्या लावल्या आहेत. त्यानंतरही घरात साप आढळून येत आहेत. माझा लवकरात लवकर मृत्यू व्हावा, अशी काहींची इच्छा आहे ज्यामुळे ही रहस्य माझ्यासमवेतच कायमची नष्ट होतील.