कोरोनाचे लसीकरण ऐच्छिक असून लसीमुळे कोणताही धोका नाही ! – डॉ. शेखर साळकर
लसीविषयी कुणालाही शंका वाटत असल्यास त्याने लसीकरण प्रक्रियेत सहभागी न होण्याचा सल्ला !
पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – ‘भारत बायोटॅक’ यांनी सिद्ध केलेल्या ‘कोवेक्सीन’ या कोरोनाच्या लसीमुळे कुणालाही धोका उद्भवणार नाही; मात्र लसीविषयी कुणालाही शंका वाटत असल्यास त्याने संपूर्ण लसीकरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी लसीकरण प्रक्रियेतून बाहेर पडणे योग्य ठरेल, असा सल्ला डॉ. शेखर साळकर यांनी दिला आहे. ‘कोवेक्सीन’ या स्वदेशी लसीला लसीसंबंधी तिसर्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होण्यापूर्वीच आपत्कालीन मान्यता देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जण लसीच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. शेखर साळकर यांनी हा सल्ला दिला.
डॉ. शेखर साळकर ट्वीट करून म्हणाले, ‘‘कोरोनाचे लसीकरण हे ऐच्छिक आहे. लसीविषयी कुणालाही शंका असल्यास त्याने या प्रक्रियेतून बाहेर पडावे. ‘मी कोणत्याही रुग्णाला धोका होऊ देणार नाही. माझे औषध कदाचित एखाद्याला लाभदायक ठरत नसेल; परंतु माझ्यावर विश्वास असलेल्यांना ते औेषध कोणत्याही स्वरूपाचा धोका देणार नाही’, या तत्त्वावर वैद्यकीय क्षेत्र चालत असते. कोरोनाच्या २ लसींना देशातील सर्वोच्च यंत्रणेने मान्यता दिलेली आहे. या दोन्ही लसींमुळे कुणालाही मोठ्या स्वरूपात धोका उद्भवू शकणार नाही. कोरोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये कुणीही ढिलाई करू नये.’’