कोरोनावरील लस २०० रुपयांमध्ये शासनाला उपलब्ध करून देणार ! – आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
मुंबई – ‘कोरोनाशिल्ड’ ही लस खासगी रुग्णालयांसाठी १ सहस्र रुपये, तर शासनासाठी २०० रुपयांना उपलब्ध करून देणार आहोत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी दिली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोरोनाशिल्ड’ ही कोरोनावरील लस सिद्ध केली असून या लसीला ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’कडून संमती मिळाली आहे. या लसीविषयीची माहिती आदर पूनावाला यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘ही लस आम्हाला विदेशातही द्यायची आहे. विदेशात या लसीचे मूल्य भारतातील मूल्यापेक्षा २-३ पट अधिक असेल. शासनाला लस दिल्यानंतर गरिबांसाठी ही लस शासनाकडून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याविषयी शासनाकडून अधिकृत भूमिका घोषित करण्यात येईल. ही लस सुरक्षित आहे, असा आमचा दावा आहे. काही अपवाद असू शकतो; मात्र या विरोधात कुणी न्यायालयात जाऊ नये, अशी विनंती आहे. यामुळे लसीकरण थांबले, तर धोका संभवतो.’’