परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !
वर्ष २०२० मध्ये झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी ऑनलाईन पद्धतीने दाखवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर परात्पर गुरु डॉक्टरांशी साधकांच्या झालेल्या भेटींच्या वेळच्या चित्रफितींमधील संवाद येथे देत आहोत.
(भाग २)
भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/438192.html
१. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व
१ उ. ‘स्वयंसूचनांचे सत्र करणे’, हा एक प्रकारचा आध्यात्मिक उपायच आहे !
साधक : परात्पर गुरुदेव, आता स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, म्हणजे ‘सारणी लिहिणे किंवा स्वयंसूचना देणे’, हे सगळे करायला मला पुष्कळ कठीण वाटते; कारण प्रयत्न करूनही माझे नामजपादी उपाय पूर्ण होत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : समजा, एकूण उपाय ३ घंटे असतील, तर २ घंटे नामजपाचे उपाय करा आणि १ घंटा स्वयंसूचनांची सत्रे करा. सत्र हेसुद्धा एक प्रकारचे उपायच आहेत आणि ते मुळापर्यंत जाणारे उपाय आहेत. जेवढे अधिक स्वभावदोष असतील, तेवढ्या प्रमाणात अनिष्ट शक्तींची आक्रमणे होण्याची शक्यता अधिक असते; परंतु स्वभावदोषच नष्ट केले, तर उपायांची आवश्यकताच रहाणार नाही. नंतर केवळ साधनाच होत जाते.
१ ऊ. ‘इतर साधकांनी परिपूर्ण सेवा करावी’, असा विचार असणे’, ही अपेक्षा नाही, तर ‘त्यांना मधुर वाणीमध्ये त्यांची चूक सांगणे’, हे त्यांच्या साधनेत एक प्रकारे साहाय्य करण्यासारखेच आहे !
साधक : माझ्या वडिलांमध्ये एक गुण आहे. ते सेवा परिपूर्ण करतात. ती चांगली गोष्ट आहे; परंतु ते सर्वांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले : ईश्वर एकसुद्धा चूक करत नाही. आपण चुका करत राहिलो, तर ईश्वराकडे कसे जाणार ? ‘एकसुद्धा चूक होता कामा नये’, अशी आश्रमातील साधक एकमेकांकडून अपेक्षा करतात. त्याला ‘अपेक्षा करणे’, असे म्हणता येणार नाही. ते तर इतरांना साधनेत साहाय्यच करत आहेत; परंतु त्यांची इतरांना समजावून सांगण्याची भाषा थोडी वेगळी असायला पाहिजे, तरच त्यातून साधकांना साहाय्य होईल.
साधक : मी कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करतो. ते व्यवस्थित बांधण्याचा माझा प्रयत्न असतो; कारण ‘त्यातून चांगली स्पंदने यायला पाहिजेत’, असे मला वाटते. जर कुणी ते अव्यवस्थित ठेवले, तर मला ते आवडत नाही. मी साधकांना सांगतो, ‘‘व्यवस्थित ठेवा. त्यातून किती चांगली स्पंदने येतात !’’ आमच्या समवेत सनातनचे संत पू. कर्वेमामा आणि सद्गुरु सत्यवानदादा हेसुद्धा सेवा करतात. आता २ – ३ दिवसांपूर्वी त्यांनी कन्नड ‘सनातन प्रभात’चा अंक घडी करून ठेवला होता. तो पाहून एवढे चांगले वाटत होते. मी सर्वांना बोलावून दाखवला, ‘‘बघा, हे किती चांगले वाटत आहे. आपल्यालाही तशीच घडी करता यायला पाहिजे.’’ अशी मी दुसर्यांकडूनसुद्धा अपेक्षा करतो. ही माझी चूक आहे का ? ‘साप्ताहिकाची कशी घडी करायची ?’, हे मी साधकांना दाखवतो.
परात्पर गुरु डॉ. आठवले : परंतु सांगतांना आपली वाणी मधुर असते ना ? ज्याप्रमाणे आई मुलाला सांगते, तसे आपले बोलणे असायला हवे. त्यामुळे दुसर्यांनासुद्धा दुःख होणार नाही. उलट ते म्हणतील, ‘‘चांगले झाले. आपण मला माझी चूक दाखवून दिलीत.’’
साधक : मला वाटते, ‘मी साधकांशी कठोरतेने बोलत नाही. त्यांना केवळ सांगतो.’
परात्पर गुरु डॉ. आठवले : ते सुधारत नसतील, तर आणखी काय करायचे ? ते सेवकेंद्रात रहातात. तुम्ही मंगळुरू येथे सेवा करायला जाता. तेथे जे उत्तरदायी साधक सेवा पहात आहेत, त्या साधकांना सांगा, म्हणजे ते नंतर चूक फलकावर लिहितील. ते प्रायश्चित्त पद्धतीचा अवलंब करतील. तुम्ही (एका टप्प्यालाच) थांबू नका. मनाला दुःख वाटून घेऊ नका. पुढे पुढे जाऊन उपाय काढा.
साधक : सर्व जण म्हणतात, ‘‘मी अपेक्षा करतो.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : जे साधनेसाठी पूरक आहे, त्याला ‘अपेक्षा’ म्हणत नाही. त्याला ‘साहाय्य’ म्हणतात. आश्रमात साधक एकमेकांना कितीतरी चुका सांगतात ना ? प्रत्येक ठिकाणी फलकावर चुका लिहिलेल्या असतात. साधकांना साहाय्य करायचे आहे; परंतु जर कुणी ऐकत नसेल, तर उत्तरदायी साधकांना सांगा.
२. नामजप साधना ही त्रिगुण आणि प्रकृती यांवर अवलंबून असते !
साधक : मला सनातनचे संत पू. कर्वेमामा यांनी सांगितले होते, ‘‘सकाळी लवकर उठून नामजप केल्यामुळे तुम्हा सर्वांना अधिक लाभ होईल.’’ त्याप्रमाणे मी नेहमी प्रयत्न करतो. मला जेव्हा जाग येते, म्हणजे पहाटे ३.३० किंवा ४ वाजता मी बसून नामजप करण्याचा प्रयत्न करतो. असे २ – ४ दिवसच झाले. कदाचित् मधेच झोप येत असेल. माझी पत्नी म्हणते, ‘‘तुम्ही तर झोपता.’’ त्याविषयी माझ्या मुलीने सांगितले, ‘‘तुम्ही नामजप लावून ‘इअरफोन’ कानात घालून नामजपाला बसलात, तर झोप येणार नाही.’’ तिने जे सांगितले, ते योग्य आहे. नंतर २ – ४ दिवसांनंतर पुन्हा त्यात खंड पडतो. नंतर पुन्हा कधीच तसा नामजप झाला नाही. मी पहाटे ५ वाजताचा गजर (अलार्म) लावतो. कधी पहाटे ४ किंवा ५ वाजता जाग येते; परंतु उठावेसे वाटत नाही. मला वाटते, ‘नंतर उठूया.’ असे का होते ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : असे काही नाही. सत्त्व-रज-तम हे गुण आहेत. ज्या दिवशी सत्त्वगुण अधिक प्रमाणात असतो, त्या दिवशी साधना चांगली होते. रजोगुण अधिक प्रमाणात असेल, तर नामजप करतांना मनात पुष्कळ विचार येतात. तमोगुण अधिक प्रमाणात असेल, तर वाटते, ‘आज झोपावे. आता नामजप करवासा वाटत नाही.’ ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे गेलो की, आपण सत्त्वगुणामध्ये स्थिर (स्टेबल) होतो. नंतर साधना हळूहळू योग्य प्रकारे होऊ लागते; म्हणून तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. साधना आणि प्रयत्न चालू ठेवावेत. होऊन जाईल. (साधकाच्या पत्नीला उद्देशून) त्यांनासुद्धा थोडा वेळ द्या बरं का !
प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते. शाळेतसुद्धा आपण बघतो, ‘काही मुले पहाटे ४ – ५ वाजता उठून अभ्यास करतात, तर कुणी रात्री २ – ३ वाजेपर्यंत जागून अभ्यास करतात.’ साधनासुद्धा आपापल्या प्रकृतीनुसार केली, तर चांगली होते आणि त्यामुळे उन्नतीही होते.
३. जी साधना केल्यामुळे प्रगती झाली, तीच साधना चालू ठेवल्यावर पुढचीही प्रगती होते !
साधिका : परात्पर गुरुदेव, पुढची साधना चांगली होण्यासाठी मी आणखी काय करायला पाहिजे ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : जी साधना करून तुम्ही ६० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत आलात. तीच साधना पुढे चालू ठेवायची. त्यामुळे आणखी पुढे जाल. जे औषध घेऊन रोगी बरा होतो, वैद्य तेच औषध चालू ठेवतात ना ! बरे वाटत असेल, तर ते औषध पालटायचे कशाला ? तसा विचार करू नका. आता साधनेची गती आणखी वाढेल. तुमची साधना योग्य दिशेने होत आहे. तोंडवळ्यावर भाव दिसून येतो. आणखी काय पाहिजे ?
४. ‘कुटुंबियांची सेवा ‘साधना’ म्हणून करणे आणि साधनेसंबंधी अन्य सेवा करणे’, एकसारखेच आहे !
साधिका : मला माझ्या लहान मुलाचे बघायचे असते. सेवा करायला सांगितले आहे; पण माझ्याकडून ती होत नाही. प्रार्थना आणि भावजागृतीचे प्रयत्न तर होतच नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : घरातील सदस्यांचे दायित्व आपल्याकडेच असते. ‘ते देवाचे एक रूप आहेत. त्याची सेवा करते’, असा मनात विचार आला, तर ‘संगणकीय सेवा करणे आणि ही सेवा करणे’ यांमध्ये कोणतेच अंतर रहात नाही. देवाला ठाऊक आहे, ‘मुलगा लहान आहे. तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे, तर देव असे म्हणणार नाही की, संगणकीय सेवा का केली नाही ?’ ‘ही माझी साधना आहे’, हा एकच भाव ठेवायचा.
(समाप्त)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |