गोपालनाचे अर्थकारण !
गोपालनाचे महत्त्व
कोणत्याच प्राण्याला सांभाळणे, हे म्हणावे तसे सोपे नाही. त्याचा स्वभाव, खाणे, पिणे, आरोग्य, सामाजिक जीवनाची प्रवृत्ती हे सारे लक्षात घेऊन काम करावे लागते. त्यातच देशी गायींची काळजी घेणे, हे तर सर्वार्थाने आणखी कठीण काम. केवळ व्यवसाय म्हणून गोपालनाकडे न पहाता उत्तम बीज आणि अपत्यपरंपरा निर्माण करण्यास या क्षेत्रात पुष्कळ महत्त्व आहे.
गोपालन करतांना गायीच्या उपप्रजातीही पारखणे आवश्यक !
गोपालनात सहभाग नोंदवतांना मी ज्या गीर नामक गायीच्या प्रजातीशी संबंधित आहे; त्यात काम करतांना त्यांचे उपप्रकार, लक्षणे आदीही लक्षात घ्यावी लागतात. हीच गोष्ट थोड्या बहुत फरकाने अन्यही प्रजातींना लागू होते. या सार्यांचे ‘डॉक्युमेंटेशन’ (कागदपत्रे) करणे, ही येणार्या काळाची आवश्यकता आहे. तसे काम विविध ठिकाणी चालूही आहे. कपिला ते सुवर्ण कपिला आणि पांढरी गीर ते कृष्णवर्णी गीर (आयुर्वेदात गायीच्या वर्णानुरूप तिच्या दुधाचे गुणधर्म कथन करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष काम करताना त्यांचा नक्कीच प्रत्यय येतो.) अशा विविध उपप्रजाती नीट पारखून आपल्याकडे सांभाळणे, हे आव्हानात्मक काम. त्यातही यांतील कित्येक दुभत्या नसतांना वा भाकड झाल्यावरही सांभाळणे, हे आणखी वेगळे आव्हान. गोरक्षण म्हणजे गायी सोडवून आणणारे गोरक्षक, गोपालन करणारे गोपालक-शेतकरी, गायींची निगा राखणारे, गोउत्पादने खरेदी करणारे असे बृहद् कुटुंब असते !
गोपालनाविषयी असणारे गैरसमज
या क्षेत्रातील बारकावे, सत्यस्थिती माहिती नसल्याने अनेकदा ‘इतके महाग दूध/तूप ?’, असे प्रश्न विचारले जातात. कित्येकदा स्वतः देशी गाय न पाळताच वा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गोपालनात कोणताही सहभाग नसलेले लोक या क्षेत्रासंदर्भात अकारण गैरसमज पसरवत असतात. तेव्हा यातील बहुविध स्तर उलगडून दाखवावे लागतात. त्यांच्यासाठी नव्हे खरोखरच ‘अथातो जिज्ञासा’ असणार्या सामान्य जनतेसाठी हा लेखप्रपंच.
गाय आणि म्हैस यांचे तूप सिद्ध होण्याच्या प्रक्रियेतील भेद
देशी गायीचे दूध वा तूप बाजारातील अन्य याच गटातील पदार्थांपेक्षा महाग असते, हे आपल्याला बर्याचदा ठाऊक असते; मात्र तसे होण्यामागील कारणांचा विचार आपण बहुतेक वेळा करत नाही. इतकेच नव्हे, तर आपण कुठल्या दोन गोष्टींची तुलना करत आहोत, याचाही विचार अनेकदा आपल्या मनामध्ये नसतो. देशी गायीच्या दुधात मेदाचा अंश हा अत्यंत नगण्य असतो. जेमतेम ४ ते ४.५ टक्के इतक्याच प्रमाणात तो आढळून येतो. यामुळे हे दूध जरी पचायला हलके असले, तरी त्यापासून तूप सिद्ध करण्याकरता लागणारा ऐवज हा पुष्कळ मोठ्या प्रमाणात वाढतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास ९ टक्के ‘फॅट’ असणारे म्हशीचे दूध वा ‘फुल क्रीम’ दूध यांच्यामार्फत तूप बनवत असता जे काम जेमतेम १० लिटर दुधाच्याही आत शक्य होते, तेच देशी गायीच्या दुधापासून तूप निर्माण करत असतांना जवळपास २५ ते ३० लिटर दुधापासून एक लिटर तूप उत्पन्न होऊ शकते.
देशी गायींच्या पालनावर होणारा खर्च
दूध वा तुपाकरता पालन केल्या जाणार्या गायींची काटेकोरपणे काळजी घेणे अत्यावश्यक असते. अशा परिस्थितीमध्ये सरासरी एका गायीचा आहार, औषधे, मनुष्यबळ असा सारा खर्च दिवसाला सरासरी ३०० ते ४०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गायींना स्वतःच्या घरातील सदस्याप्रमाणे वागवणारे गोपालक त्यांच्या खाण्यात कुठलीही कसर ठेवत नाहीत. वेळोवेळी चार्यासह ऊस आणि मक्याचे भांड, गुळाची ढेप; खनिजे कमी पडू नयेत, यासाठी सैंधव आदींचा वापर केला जातो. या सार्या आहारासह सकस दूध बनण्याकरता धान्यांच्या मिश्रणाचा शिरा बनवून त्यांना खायला घातला जातो. वर नमूद केलेली रक्कम ही इतकी का ? याचे उत्तर आपल्याला मिळाले असेलच. येथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी की, गोशाळेत असलेल्या सगळ्याच गायी दुभत्या असतील असे नाही. किंबहुना कित्येक गायी या भाकडही असतात. त्यांच्यावर केल्या जाणार्या खर्चातून प्रत्यक्षात गोपालकांना कुठलाही परतावा मिळण्याची शक्यता नसते. तरी कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना घरातील सदस्याप्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत जपले जाते. थोडक्यात त्यांच्यावर केला जाणारा खर्च हा निवळ खर्च असतो.
पारंपरिक पद्धतीने आणि ‘डेअरी इंडस्ट्री’मध्ये सिद्ध होणारे तूप यांतील भेद
एका गायीकडून दिवसाला सरासरी ५ ते ७ लिटर दूध मिळते. दुधाचे भरमसाठ उत्पन्न घेण्याच्या नादात ‘ऑक्सिटोसीन’सारखे ‘हॉर्मोन्स’ टोचण्याचे अमानवी प्रकार इथे होत नाहीत. त्यातच भारतीय तत्त्वांवर चालणार्या गोशाळांत बछड्यांना दूध देऊन त्यानंतर मग उर्वरित दुधाचे वितरण वा तुपामध्ये रूपांतर केले जाते. हे संपूर्ण अर्थकारण लक्षात घेतल्यास दुधाला सरासरी ८० ते ९० रुपये प्रति लिटर, तर तुपाला सरासरी २ सहस्र ५०० रुपये प्रति लिटर असा बाजारभाव का लावला जातो ? याचे कारण आपणास सहज उमगेल. हे तूप आयुर्वेदाला अपेक्षित असलेल्या गुणधर्मांनी युक्त असलेले असते. ‘डेअरी इंडस्ट्री’मध्ये सिद्ध होणारे तूप हे मुळात जो फॅटचा अंश कायदेशीररित्या दूध विकत असता त्यामध्ये ठेवणे योग्य नसते; त्याला घुसळून बाजूला काढून निर्माण झालेल्या क्रीमला ‘हिट जॅकेट’मध्ये घालून अथवा ‘सेंट्रीफ्यूज’ करून वितळवून सिद्ध केलेले असते. याला तूप नव्हे, तर ‘बटर ऑईल’ अशी संज्ञा आहे. केवळ ‘कोलेस्ट्रॉल’ असलेल्या अशा या ‘बटर ऑईल’च्या किमतीची तुलना विरजण लावून, ताक घुसळून, लोणी कढवून पारंपरिक पद्धतीने सिद्ध केलेल्या आणि अमृतासमान असलेल्या देशी गायीच्या तुपाबरोबर करत असल्यास आपण पितळेला सोन्यासह तोलत आहोत.
गोपालनात सहभागी व्हा !
त्यातही हे सारे अर्थकारण नीट लक्षात घेतल्यावर प्रत्यक्षात हा दर लावूनही हा लाभदायी व्यवसाय होणार नाही, हे सूज्ञ वाचकांच्या ध्यानी आले असेलच ! तो तसा करण्यास त्याला सेंद्रिय शेतीची जोड द्यावी लागते. गोपालन आणि शेती परस्परपूरक व्यवसाय असून ते काळासाठी आवश्यक आहेत. शेतकरी बांधवांनी याचा जरूर विचार करावा. शेतकरी नाहीत त्यांनी; शहरातील अगदी सामान्य मध्यमवर्गीय माणसांनीही स्वतःचे ४ जणांचे कुटुंब मासातून दोनदा हॉटेलमध्ये गेल्यावर होणार्या खर्चापेक्षाही अल्प खर्चात एका मासाचे अस्सल तूप येते, हे लक्षात घ्यावे. घरीच तूप सिद्ध करतांना ते देशी गायीच्या दुधापासून सिद्ध केले जाईल, याकडे लक्ष द्यावे. हे सारे सहज शक्य आहे. मी स्वतः माझ्या घरापासून याला आरंभ केला. देशी गाय या विषयावर सतत अभ्यास केला. याविषयावरील दोन पुस्तकांचा भावानुवाद केला. नकारात्मकता पसरवणार्या व्यक्तींच्या नादी लागून देशी गायींचे पालन करणार्यांवर आक्षेप घेत बसण्यापेक्षा आपणही या कार्यात कसे सहभागी होऊ शकाल, याचा विचार करून पहा. त्यातच आपण, आपले कुटुंब, समाज आणि पर्यायाने देशाचे भले आहे.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली, जिल्हा ठाणे(संदर्भ : दैनिक ‘तरुण भारत’)