माझ्या आत्म्यात अजूनही भाजप आहे; मात्र गरिबाचे कुणीही काम केले नाही ! – शेतकर्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
गुजरातमध्ये शेतकर्याची पंचायत कार्यालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या
|
महिसागर (गुजरात) – येथील बाकोर गावात रहाणार्या बलवंतसिंह या शेतकर्याने पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. बलवंतसिंह हे वारंवार शासकीय साहाय्यासाठी पंचायत कार्यालयात चकरा मारत होते; मात्र शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याने त्यांनी शेवटी आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी मिळाली आहे. यात म्हटले आहे, ‘माझ्या आत्म्यात अजूनही भाजप आहे; परंतु माझ्या गरिबांचे काम कुणी केले नाही.’
पोलिसांना आत्महत्या करत असल्याचे दूरभाष करून कळवूनही पोलीस निष्क्रीय‘याला उत्तरदायी असंवेदनशील पोलिसांना भर चौकात फाशी दिली पाहिजे’, अशी कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! आत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंह यांनी बाकोर पोलीस ठाण्यात दूरभाष केला होता. हा दूरभाष पंचायत कार्यालयातून करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी पोलीस कर्मचार्याला सांगितले, ‘सरकारी कर्मचारी माझे काम करत नाहीत. त्यामुळे मी आत्महत्या करणार आहे.’ तथापि ‘पोलिसांनी बलवंतसिंह यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही’, असा आरोप आहे. गरीब असल्याने कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळाला नाही ! – आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बलवंतसिंह यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, सेवकाचा अर्थ सेवा देणे आहे; परंतु सरकारी कार्यालयात असे होत नाही. मी एक गरीब माणूस आहे आणि वर्षानुवर्षे भाजपवर विश्वास ठेवत आहे. माझ्या आत्म्यात भाजप आहे. शेवटपर्यंत भाजपसमवेत राहिलो. माझा मृत्यू झाला, तरी मी भाजपवर विश्वास ठेवत राहीन. पक्षात अजूनही माझा आत्मा आहे; पण गरीब असल्याने मला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. बलवंतसिंह यांचा मुलगा राजेंद्र यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलांनी स्वत:च्या भूमीचा काही भाग विकून घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते. ते ५ वर्षांपासून ‘पंतप्रधान आवास योजने’च्या साहाय्यासाठी अर्ज करत होते. या सूचीमध्ये त्यांचे नावही आले; परंतु पंचायत कार्यालयाकडून त्यांना आर्थिक साहाय्य मिळाले नाही, असा आरोपही त्यांनी केला. |