कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणचा संरक्षक पत्रा कोसळून दुचाकीस्वार घायाळ
महामार्ग ठेकेदारावर गुन्हा नोंद होण्यासाठी संतप्त नागरिकांचे रस्ताबंद आंदोलन
कणकवली – येथे मुंबई-गोवा महामार्गावर पूलाचे काम चालू असतांना पटवर्धन चौकात बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या खाली लावलेले संरक्षक पत्रे पडून एक दुचाकीस्वार युवक घायाळ झाला. ‘ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे असे अपघात येथे वरचेवर होत असतात’, असा आरोप करत नागरिकांनी ‘ठेकेदारावर गुन्हा नोंद करावा’, या मागणीसाठी रस्ताबंद आंदोलन केले. या वेळी ४५ मिनिटे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. (नागरिकांना आंदोलन करून अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कृती का करत नाहीत ? – संपादक) अखेर पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकारामुळे नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत होत्या. (महामार्गाचे काम कणकवली शहरात चालू झाल्यापासून अनेकविध समस्या तेथे निर्माण झाल्या आणि होत आहेत. यापूर्वी शहरात बांधण्यात येत असलेल्या एका पुलाच्या भिंतीचा काही भाग कोसळून अपघात झाला होता. लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी आंदोलने करूनही ठेकेदार अन् प्रशासन योग्य त्या उपाययोजना न करता जनतेच्या जीवाशी खेळत असेल, तर याचा अर्थ काय घ्यायचा ? – संपादक)
त्यामुळे नागरिकांनी आंदोलन केले. या वेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.