ख्रिस्त्यांची ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे मेणबत्ती प्रार्थनासभा : सभेला भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांची उपस्थिती

शंखवाळी तीर्थक्षेत्री पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम स्थानिक ख्रिस्त्यांनी विरोध करत बंद पाडल्याचे प्रकरण

स्वतःच इतरांच्या धार्मिक कृत्यांमध्ये बाधा आणून शांतता भंग करायची आणि नंतर प्रार्थनासभा घ्यायची, हा ख्रिस्त्यांचा ढोंगीपणा !

वास्को – सांकवाळ येथील ख्रिस्त्यांनी ३ जानेवारी या दिवशी सायंकाळी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी सांकवाळ येथील ‘अवर लेडी ऑफ हेल्थ चर्च’चे पॅरिश (चर्चचे सदस्य) फादर लुईस आल्वारिस यांच्या उपस्थितीत मेणबत्ती प्रार्थनासभेचे आयोजन केले. गावात शांतता, एकसंघता आणि एकोपा निर्माण करण्यासाठी या प्रार्थनासभेचे आयोजन केल्याचे ख्रिस्त्यांचे म्हणणे आहे. या वेळी कुठ्ठाळीच्या भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांचीही उपस्थिती होती. सभेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळी) ३० डिसेंबर या दिवशी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाचा कार्यक्रम केला होता. हा कार्यक्रम चालू असतांना स्थानिक ख्रिस्त्यांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही चर्चची भूमी असल्याचा दावा करून पोलिसांवर दबाव आणत भक्तांचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद पाडला. या प्रकरणी सांकवाळ येथील ‘पॅरिशनर्स’ (चर्चचे सदस्य) यांनी स्थानिक सरपंच रमाकांत बोरकर आणि कुठ्ठाळीच्या भाजपच्या आमदार एलिना साल्ढाणा यांची भेट घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे पूजा-अर्चा करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सांकवाळ येथील ख्रिस्त्यांनी ३ जानेवारी या ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे मेणबत्ती प्रार्थनासभेचे आयोजन केले.