देहली ते मेरठ मार्गावरील भुयारी मार्गासाठी पुन्हा चिनी आस्थापनाला कंत्राट

जूनमध्ये गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर रहित करण्यात आले होते कंत्राट !

  • ‘आत्मनिर्भर भारता’ची घोषणा करणार्‍या सरकारने ‘शत्रूराष्ट्राच्या आस्थापनाला कंत्राट देण्याची वेळ का आली’, याविषयी राष्ट्रप्रेमींना स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे !
  • यातून ‘भारताचा चीनविरोध किती पोकळ आहे आणि चीनच्या वस्तू, तसेच तंत्रज्ञानाविना भारत प्रगती करू शकत नाही’, असा संदेश जातो. हे भारताला लज्जास्पद !

नवी देहली – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाकडून देहली ते मेरठ या मार्गावर ‘रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम’च्या अंतर्गत येणार्‍या भुयारी मार्गाचे काम ‘शांघाई टनल इंजिनीयरिंग’ या चिनी आस्थापनाला देण्यात आले आहे. भारत-चीन सीमावादावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनी कंपनीला देण्यात आलेले कंत्राट रहित करण्यात आले होते. आता मात्र पुन्हा एकदा शांघाई टनल इंजिनीयरिंग कंपनीला कंत्राट देण्यास मान्यता दिली आहे. देहलीतील न्यू अशोकनगर ते गाझियाबाद येथील साहिबाबाद या मार्गावर भूमीखालून जाणारा ५.६ कि.मी.चा मार्ग हे आस्थापन बनवणार आहे.

प्रस्तावित देहली ते मेरठ रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम

जून २०२० मध्ये काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत शांघाई टनल इंजिनीयरिंगने १ सहस्र १२६ कोटी रुपयांची बोली लावली होती. भारतीय आस्थापन ‘एल्. अँड टी.’ने १ सहस्र १७० कोटी रुपयांची, टाटा प्रोजेक्ट आणि एस्.के.ई.सी.के.जे.व्ही. यांनी १ सहस्र ३४६ कोटी रुपयांची बोली लावली होती.

रा.स्व. संघाची सहयोगी संस्था स्वदेशी जागरण मंचाचा विरोध

रा.स्व. संघाची सहयोगी संस्था असणार्‍या स्वदेशी जागरण मंचने हे कंत्राट रहित करून भारतीय आस्थापनाला देण्याची मागणी केली आहे. ‘जर सरकार ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ यशस्वी करू इच्छित असेल, तर अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चिनी आस्थापनांना बोली लावण्याचा अधिकार देण्यात येऊ नये’, असे म्हटले आहे.

चीनने लडाख सीमेवर भारतीय चौक्यांसमोर तैनात केले रणगाडे !

चीनच्या कुरापती पहाता चीन युद्ध करण्यासाठी भारतावर दबाव निर्माण करत आहे, हे लक्षात येते ! चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी भारतानेही तितकीच सिद्धता करावी !

लेह (लडाख) – चीनने येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्यांच्या समोर ३० ते ३५ रणगाडे तैनात केले आहेत. येथील रेजांग ला, रेचिन ला आणि मुखोसरी येथे हे रणगाडे तैनात करण्यात आले आहेत. भारत आणि चीन यांच्यात येथे गेल्या ८ मासांपासून वाद चालू आहे. दोन्ही सैन्याने जवळपास १ लाखाहून अधिक सैन्य तैनात केले आहे. दोन्ही सैन्यांमध्ये ९ वेळा चर्चाही झाली आहे; मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही.