६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांची कु. पूनम चौधरी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
‘मी वर्ष २०११ मध्ये पूर्णवेळ साधिका झाले. तेव्हा गुरुदेवांनी मला क्षिप्राताईसह शिकण्यासाठी पाठवले होते. त्या वेळी मला तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. क्षिप्राताई भोजन वाढून घेतांना शिळा पदार्थ संपवण्यासाठी प्रथम वाढून घेते.
२. आश्रमाच्या स्वच्छतेची सेवा असो किंवा अन्य कोणतीही सेवा असो, ती मनापासून आणि झोकून देऊन करते.
३. मी पूर्णवेळ साधिका झाल्यानंतर माझ्या आईला ताण आला होता. तेव्हा ताई स्वत:हून माझ्या आईला भेटली. ताईमधील प्रेमभावामुळे माझी आई नेहमी तिची आठवण काढते.
४. मोठ्या बहिणीप्रमाणे काळजी घेणे
क्षिप्राताईमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. मी पूर्णवेळ साधिका झाले. त्या वेळी मला साधनेसाठी घरातून विरोध होता. त्यामुळे मला कोणते साहित्य हवे असल्यास ती पहायची आणि माझ्याकडे जे साहित्य नसेल, ते ती स्वत:हून मला आणून द्यायची. ती मोठ्या बहिणीप्रमाणे माझी काळजी घ्यायची. त्या वेळी ताईने मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सांभाळून घेतले.
५. इतरांचा विचार करणे
देहलीत आम्ही साधिका एकत्र रहात होतो. ताईला पंखा लागत नसल्याने ज्या जागी पंख्याचा वारा लागत नाही, तिकडे ती झोपायची. यातून ‘आपल्यामुळे अन्य साधिकांना त्रास होऊ नये’, असा तिचा विचार असायचा.
६. संत आणि परात्पर गुरुदेव यांच्याप्रती असलेला भाव
६ अ. ताईच्या मनात सद्गुरु पिंगळेकाकांप्रती पुष्कळ भाव आहे. देहली सेवाकेंद्रात असतांना ती तिच्या मनातील सर्व विचार सद्गुरु काकांना सांगायची. ‘संतांशी मनमोकळेपणाने कसे बोलायचे’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.
६ आ. ताईची प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांवर अतूट श्रद्धा असते. मी माझी नकारात्मक स्थिती ताईला सांगितल्यावर ती म्हणायची, ‘‘गुरुदेव सर्व पहात आहेत.’’
७. क्षिप्राताईध्ये परखडपणा पुष्कळ आहे. जिथे चुकीचे घडते, तेथे ती परखडपणे बोलते.
गुरुदेवांच्या कृपेने मला अनेक गुण असलेल्या क्षिप्राताईसह रहाण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. यासाठी मी गुरुदेवांच्या कोमल श्रीचरणी कोटी कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र (२१.७.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |