रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ऋषियागाच्या वेळी डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती !
‘२१.९.२०१८ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात सायंकाळी ऋषियाग झाला. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ऋषियागामुळे सर्व ऋषींची महती लक्षात येऊन त्यांच्याप्रती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
ऋषियागाच्या वेळी दक्षिणामूर्ती शिवगुरु, महर्षि व्यास, शुकमुनी, अगस्तीमुनी आणि अत्रि, भरद्वाज, गौतम, जमदग्नि, विश्वामित्र, वसिष्ठ, कश्यप या ११ महर्षींची कलशांच्या रूपात स्थापना केली. वेदमूर्तींनी त्या कलशांचे षोडशोपचार पूजन केले. ते पाहून माझ्याकडून सर्व महर्षींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त झाली. ‘या सर्व ऋषींनी हिंदु धर्म समृद्ध करण्यासाठी महान योगदान दिले आहे’, याची मला जाणीव झाली. या यागाच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेव आम्हा साधकांचे ऋषीऋण फेडत आहेत’, असे मला जाणवले. प्रतिवर्षी गुरुदेव आम्हा सर्व साधकांकडून गुरुपौणिमा साजरी करून घेतात. त्यांनीच आम्हा साधकांना गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शिकवले आहे. त्यामुळे साधकांना गुरुतत्त्वाचा सहस्र पटींनी लाभ होत आहे.
२. ऋषींनी मानवाच्या कल्याणासाठी केलेले कार्य
अ. अत्रि ऋषींचे पुत्र म्हणून त्रिदेवांनी दत्तात्रेयाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला आणि मानवाला पितर ऋण फेडण्यासाठी देवता उपलब्ध करून दिली.
आ. जमदग्नि ऋषींची पत्नी रेणुकादेवी आमची कुलदेवता आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला कुलदेवतेचे महत्त्व सांगून आमच्याकडून तिची उपासना आणि नामस्मरण करवून घेतले. तसेच आम्हाला अनुभूती देऊन आमचे प्रारब्ध सुसह्य केले; म्हणून आम्ही श्री रेणुकादेवी आणि परात्पर गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.
इ. विश्वामित्र ऋषींनी गायत्रीमंत्र निर्माण केला आणि हा मंत्र सर्व मंत्राचा मुकुटमणी आहे.
ई. कश्यप ऋषींनी आदितीमातेच्या पोटी देवतांना जन्म दिला आणि संपूर्ण सृष्टीवर अनंत उपकार केले आहेत.
एकेका ऋषींची महती गाण्यास माझी वाणी थोटकी आहे. या महान ऋषींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आश्रमात ऋषियाग करण्यात आला; म्हणून मी श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
३. वेदमूर्ती गुरुमूर्ती यांनी अकरा कलशांतील तीर्थाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर जलाअभिषेक करणे
३ अ. प्रभु श्रीरामाने प्रथम बिभीशणाचा राज्याभिषेक करून नंतर रावणाचा नाश केला आणि बिभीषणाला लंकाधिपती बनवले, त्याप्रमाणे वेदमूर्तींनी सद्गुरुद्वयींवर केलेला जलाभिषेक करून हिंदु राष्ट्र येण्याअगोदरच त्यांचा राज्याभिषेक केल्याचे जाणवणे : ऋषियागाच्या शेवटी वेदमूर्ती गुरुमूर्तींनी अकरा कलशांतील तीर्थाने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर जलाअभिषेक केला. तेव्हा मला पुढील प्रसंगाचे स्मरण झाले. ‘त्रेतायुगात श्रीरामाने बिभिषणाला आश्रय दिला. (बिभिषण श्रीरामाला शरण येतो, तेव्हा श्रीराम कमंडलूतील तीर्थ शिंपडून तो त्याला ‘लंकाधिपती’ म्हणतो. तेव्हा बिभिषण रामाला लंकाधिपती रावण असल्याचे सांगतो. त्या वेळी राम ‘पुढे लंका तुलाच सांभाळायची आहे’, असे सांगतो. या अर्थी तो राज्याभिषेक म्हटले आहे.) त्या वेळी श्रीरामाने प्रथम बिभिषणाचा लंकाधिपती म्हणून राज्याभिषेक केला आणि नंतर रावणाचा नाश करून बिभिषणाला लंकेचा राजा बनवले.’ त्याचप्रमाणे ‘वेदमूर्ती गुरुमूर्ती यांच्या हस्ते सनातनच्या सद्गुरुद्वयींना झालेला हा जलाभिषेक म्हणजे राज्याभिषेक आहे. हिंदु राष्ट्र येण्याअगोदरच ईश्वराने हा राज्याभिषेक करवून घेतला आहे’, असे मला जाणवले.
३ आ. ऋषियागातील तीर्थाने सद्गुरुद्वयींवर अभिषेक होणे, हा ईश्वराने दिलेला शुभसंकेतच आहे ! : आध्यात्मिक विश्वविद्यालयाचे नाव ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आहे. त्यामुळे ‘ऋषियागातील तीर्थाने सद्गुरुद्वयींवर अभिषेक होणे, हा ईश्वराने दिलेला शुभसंकेतच आहे’, असे मला जाणवले.
४. वेदमूर्तींचा सन्मान सोहळा पाहून अनुभवलेली भावावस्था !
ऋषियागाच्या समारोपाच्या वेळी वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, वेदमूर्ती अरुण आणि वेदमूर्ती राजकुमार यांचा सन्मान सोहळा झाला. या सोहळ्यामुळे माझा ऊर प्रीतीने दाटून आला. या यज्ञामुळे मला देवतांविषयी प्रीती वाटली आणि परात्पर गुरु, सद्गुरु, संत, महर्षि अन् सर्व साधक यांच्याविषयी अनंत कृतज्ञता व्यक्त झाली.’
– डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.९.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |