राजकीय ‘लस’ !
भारतात ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींना केंद्र सरकारने तातडीच्या वापरासाठी संमती दिली असतांना समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र वेगळेच तुणतुणे लावले आहे. ‘ही भाजपने निर्माण केलेली लस आम्ही टोचून घेऊ शकत नाही. आम्ही भाजपवर कसा विश्वास ठेवायचा ?’, असा हास्यास्पद प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याच यादव महाशयांनी ‘वर्ष २०२२ मध्ये होणारी उत्तरप्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यास जनतेचे विनामूल्य लसीकरण करणार’, अशी घोषणा केली आहे.
‘पुढील वर्षीची निवडणूक यादव जिंकतील का ?’ हा वेगळा प्रश्न; मात्र समजा ते जिंकून आले, तर जी लसीकरण मोहीम राबवणार, ती ‘समाजवादी’ लसीकरण मोहीम असणार का ? एवढ्या मोठ्या प्रमाणात ते समाजाला कुठून लस आणून देणार आहेत ? वास्तविक केंद्र सरकारने ‘ही लस ऐच्छिक आहे’, हेही घोषित केले होते. त्यामुळे यादव यांना ही लस घ्यायची नसेल अथवा ‘ही ‘भाजप’ लस आहे’, असे त्यांना वाटत असल्यास त्यास ते नकार देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला तितकेसे महत्त्व नाही. उलट असे वक्तव्य करून त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे. कोरोना महामारीच्या संकटावर मात करून भारताचे अर्थकारण, समाजकारण पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी लसीची आवश्यकता आहे. त्यामुळे लसीकरणाची मोहीम जलद गतीने चालवणे आवश्यक आहे. असे असतांना त्याला पाठिंबा देण्याऐवजी, लसीकरण मोहीम अधिक जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अखिलेश यादव याविषयी राजकारण करत आहेत, हे संतापजनक होय. राजकारण्यांना सत्ता महत्त्वाची असते आणि त्याच्या प्राप्तीसाठी त्यांना राजकारण करावे लागते, हे मान्य; मात्र जनतेच्या आरोग्याशी किंवा अत्यंत संवेदनशील विषयावर तरी राजकारण न करण्याचे पथ्य राजकारण्यांनी पाळायला हवे. ही राजकारण्यांकडून जनतेची किमान अपेक्षा आहे. यादव यांच्यासारख्यांना हे कसे कळत नाही ? ‘असा विरोध करून उत्तरप्रदेशमधील जनतेच्या मनात घर करू’, असे यादव यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहेे; कारण तेथील जनतेला समाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष ठाऊक आहे. काही इस्लामी संघटनांनी ‘मुसलमानांनी ही लस घेऊ नये’, असे आवाहन केले आहे. अशा धर्मांधांना आणि जनताद्रोह्यांना यादव यांच्यासारख्या राजकारण्यांनी असे मत मांडल्यावर बळ मिळेल अन् पुढील निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या पदरात त्यांची मते पडतील; मात्र सत्तेवर येण्यासाठी ही मते पुरेशी असतील का ? कोरोनाच्या विरोधात लसीकरणाची राष्ट्रव्यापी मोहीम राबवली जात असतांना त्याला सर्वच स्तरांवरील लोकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे; कारण देश जितक्या लवकर कोरोनामुक्त होईल तितक्या लवकर येथील सामान्य जीवन सुरळीत होईल आणि त्याचा थेट परिणाम अर्थकारणावर होईल; मात्र असे करण्याऐवजी त्याला विरोध करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे यादव यांच्यासारख्या राजकारण्यांवर कारवाई व्हायला हवी. जनहिताऐवजी स्वहिताकडे लक्ष देणारे असे राजकारणी भारताच्या भवितव्यासाठी घातक आहेत. सतत स्वहिताचाच विचार करणारे असे राजकारणी समाजाचा उत्कर्ष करू शकत नाहीत. त्यामुळे अशांना घरी बसवण्यासाठी आता जनतेनेच पावले उचलणे आवश्यक !