बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत. असे शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवतील का ? या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन वरिष्ठ अधिकार्यांनी प्राचार्या पाटील यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !
बुलढाणा – संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील गरीब शेतकरी कुटुंबातील आम्रपाल भिलंगे हा शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डिझेल मॅकेनिकल शाखेत गेल्या २ वर्षांपासून शिक्षण घेत आहे. त्याने पुढील शिक्षणासाठी त्याची मूळ कागदपत्रे संस्थेच्या प्राचार्या राजश्री पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे मागितली. पाटील यांनी त्याला शिवीगाळ करून अवमानित केले.
विद्यार्थ्याला शिवीगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.#buldhana #shegao #crime https://t.co/1rKzLL85Hg
— ABP माझा (@abpmajhatv) January 2, 2021
आम्रपाल याने कागदपत्रे देण्याची विनंती करूनही प्राचार्यांनी नकार दिल्यावर ‘आता माझ्या करिअरविषयी विचार करावा. माझ्यासमोर आता मरण्याविना पर्याय नाही !’ अशी भावना त्याने व्यक्त केली. या वेळी प्राचार्या राजश्री पाटील यांना दया न येता ‘तू माझ्यासमोर आताच मर, आम्ही काही तुझ्या बापाचे नोकर नाही. हे महाविद्यालय काही तुझ्या बापाचे नाही !’ आम्रपाल याला शिवीगाळ करून म्हणाल्या, ‘‘जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग की, ही बाई मला शिव्या देते म्हणून !’’
सामाजिक माध्यमांमध्ये या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. आम्रपाल आणि त्याच्या आई-वडिलांनी अशा उर्मट प्राचार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पत्रकारांशी बोलतांना राजश्री पाटील यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन हुज्जत घातली. ‘प्रथम असे काही घडलेच नाही’, असा त्यांनी कांगावा केला. पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्यांनी तसा प्रकार घडल्याचे मान्य केले; मात्र या घटनेवर त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.