बचतगटांच्या २२ लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी दोन बचतगटाच्या तीन महिलांना पोलीस कोठडी
महिलाही भ्रष्टाचारात आघाडीवर येणे, लज्जास्पद !
कुडाळ – तालुक्यातील घावनळे येथील जागृती प्रभाग संघ आणि स्वरूप स्वयं-साहाय्यता संघ कारिवडे (सावंतवाडी) या बचतगटांना शासनाकडून प्राप्त झालेल्या २२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सौ. सेजल संजय कारिवडेकर, सौ. सत्यवती अनंत नाईक (दोघीही राहणार कारिवडे-देऊळवाडी) आणि प्रियांका पांडुरंग राऊळ (राहणार घावनळे, कुडाळ) या तिघींना कुडाळ पोलिसांनी २ जानेवारीला अटक केली होती. या तीनही महिलांना ३ जानेवारी या दिवशी येथील न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी बजावली. (ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासह सांघिक पद्धतीने काम करून त्यांची पर्यायाने गावाची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी ‘महिला बचतगट’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. शासनाकडून अशा बचतगटांना विविध प्रकारे काम दिले जाते किंवा त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक)
शासनाकडून २८ जुलै ते २४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नत्ती अभियानाच्या अंतर्गत जागृती प्रभाग संघाला २२ लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. या शासकीय निधीचा बचतगटाच्या पदाधिकारी महिलांनी संगनमताने परस्पर अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात २४ नोव्हेंबर २०२० या दिवशी गुन्हा नोंद झाला होता.