परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन
५ जुलै२०२० या दिवशी गुरुपौर्णिमा होती. त्या निमित्ताने साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेसंबंधी केलेले अमूल्य मार्गदर्शन’ या विषयावर पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांशी झालेल्या भेटींच्या वेळची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्या वेळी साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर परात्पर गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
२ जानेवारी या दिवशी मार्गदर्शनातील काही सूत्रे आपण पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
(भाग ४)
भाग ३ पहाण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/437507.html
९. घरालाच आश्रम बनवल्यावर तेथे आश्रमासारखी साधना करू शकतो !
साधक : ‘येथे आश्रमात जसे वातावरण आहे, तसे बनवून आम्ही साधना कशी करू ?’, हे कृपया आपण स्पष्ट करून सांगावे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : शिल्पा कुडतरकरचे (आताच्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचे) नाव ऐकले असेल ना ? तिचा विवाह झाला. नवरा मुलगा न्यू जर्सीचा होता. तिला तिकडे जायचे नव्हते आणि तिकडे जाण्यासाठी रात्री २ वाजताचे विमान होते. जाण्यापूर्वी ती रात्री ९ – १० वाजता मला भेटायला आली आणि रडत रडत म्हणाली, ‘‘मला अमेरिकेला जायचे नाही.’’ मी विचारले, ‘‘का बरे ?’’ प्रत्येक ग्रंथात माझ्या छायाचित्राच्या खाली पुढील ४ ओळी असतात.
‘स्थूल देहा असे स्थळकाळाची मर्यादा ।’
कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ॥
सनातन धर्म माजे नित्य रूप ।
त्या रूपे सर्वत्र आहे सदा ॥
ती जेव्हा रडू लागली. तेव्हा मी तिला त्या ४ ओळी लिहून दिल्या आणि म्हटले, ‘‘अरे, भगवंत तर सर्वत्र असतो. मग रडतेस कशाला ? अमेरिकेमध्ये भगवंत नाही का ?’’ त्यामुळे तिला थोडा धीर आला आणि ती अमेरिकेला गेली. तिचे तेथील पहिले वर्ष असल्याने सर्व अद्भुत होते. सर्व नवीन होते. ती आनंदात होती. दुसर्या वर्षी तिचा भ्रमणभाष आला, ‘‘मला येथे रहायचे नाही. मला भारतात परत यायचे आहे. सर्व लोक दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहातात. असले जीवन असते का ?’’ मी म्हटले, ‘‘असे नाही. तू आश्रमात राहिली आहेस. ‘आश्रमात कसे रहायचे ?’, हे तुला ठाऊक आहे. तू घरातही त्याच प्रकारे रहायला आरंभ कर आणि बघ. नंतर तू मला सांग.’’ तिने तसे करायला आरंभ केले. प्रथम तिने दरवाजावर ‘सनातन आश्रम’ असे लिहिले. नंतर त्याखाली तिचे आणि तिच्या यजमानांचे नाव लिहिले. बाहेरून घरात आल्यावर ‘मी आश्रमात येत आहे’, असे ती मनाला बजावत असे. पुढे काही दिवसांनी तिने दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे आणि गाणी ऐकणे इत्यादी बंद केले. आश्रमात नामजप करतात. ती स्वयंपाक करतांना नामजप करू लागली. कपडे धुतांना ती ‘मी भगवान श्रीकृष्णाचे कपडे धूत आहे’, असा भाव ठेवू लागली आणि त्याच भावावस्थेत राहू लागली. नंतर ५ – ६ मासांपर्यंत प्रत्येक मासाला तिचा भ्रमणभाष येतच होता. तेव्हा तिने सांगितले, ‘‘आता मला चांगले वाटते. येथेसुद्धा देव आहे.’’
पुढच्याच मासात तिच्या यजमानांचा एक जुना मित्र त्यांंना भेटायला घरी आला. यजमान ८ – १० वर्षांपासून अमेरिकेत रहात होते. शिल्पा विवाहानंतर तेथे गेली होती. तिच्या यजमानांचा मित्र आल्यावर तिच्या यजमानांनी काय केले ? अमेरिकेतील पद्धतीप्रमाणे मद्याची बाटली, काचेचे पेले इत्यादी ठेवले आणि मित्राला म्हटले, ‘‘अरे मित्रा, तू घरचाच आहेस. तुला जी दारू चांगली वाटते, ती तू घे.’’ मित्राने २ – ३ मिनिटे बाटल्यांकडे पाहिले आणि म्हटले, ‘‘तुझ्या घरात दारू पिण्याची इच्छाच होत नाही. ठेवून दे.’’ तिने घर किती सात्त्विक केले ! तुम्हाला कशाची चिंता आहे ? तुम्हीसुद्धा आपले घर सात्त्विक करा.
साधक : आपण योग्य उदाहरण दिलेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आणखी काही झाले, तर शिल्पाला विचारा, ‘तिने आणखी काय काय केले ?’ रामनाथी आश्रमात विदेशी साधकांचे साधनेसंबंधी शिबिर होते. तेव्हा शिल्पा आणि फ्लोरिडाची एक मुलगी आली होती. त्यांनी मला सांगितले, ‘‘अमेरिकेहून भारतात येण्यासाठी विमानाचे तिकीट काढायला सर्व लोकांकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांना साधना करायची आहे.’’ तेव्हा फ्लोरिडाच्या मुलीने विचारले, ‘‘फ्लोरिडामध्ये आपला आश्रम बनवणार का ? त्यासाठी मी जागा घेईन.’’ तेव्हा शिल्पा म्हणाली, ‘‘आपण न्यू जर्सीमध्ये आश्रम बनवणार का ?’’ तेव्हा मला वाटले, ‘शिल्पा जागा खरेदी करणार किंवा सदनिका खरेदी करणार.’ इत्यादी.’ तिच्या बाजूला भावना शिंदे (पू. (श्रीमती) भावना शिंदे) होती. तिने सांगितले, ‘‘शिल्पा स्वतःच्या घराविषयी बोलत आहे.’’ तिचे घर पुष्कळ मोठे आहे. बैठककक्ष (हॉल) एवढा मोठा आहे की, ३० लोक बसले, तरीसुद्धा सत्संग सहजपणे होऊ शकतो. शिल्पाचे ‘आता माझे घर आहे’, असे नाही. ‘इदं न मम ।’ (अर्थ : हे माझे नाही.), असे पूजेमध्ये म्हणतात ना तसे आहे ! आपण केवळ बोलतो; पण तसा विचार करत नाही. ती केवळ बोलली नाही, तर तिने प्रत्यक्ष कृती करून दाखवली. आता ती संतपदाला पोचली आहे.
(समाप्त)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |