‘देवच सर्व करतो’, या भावस्थितीत असणार्या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी !
साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी (४.१.२०२१) ला पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पू. जलतारेआजींना सकाळी चहा देणारी साधिका नवीन असणे आणि ती त्यांना बिस्किटे काढून देण्यास विसरणे
‘मी पू. जलतारेआजींच्या खोलीत रहाते. प्रतिदिन सकाळी पू. आजी चहासोबत २ – ३ बिस्किटे घेतात. त्या वेळी मी झोपलेली असते. एकदा सकाळी मला बिस्किटाचा पुडा फोडतांनाचा आवाज आला. त्या वेळी झोपेतच माझ्या मनात विचार आला, ‘पू. आजींना पुडा फोडता येत नाही’, असे वाटते. आपण उठून आजींना बिस्किटे काढून द्यायला हवीत’; पण मी पुष्कळ झोपेत असल्याने तो विचार करून मी पुन्हा गाढ झोपले. (त्या वेळी चहा देणारी साधिका नवीन असल्याने ती बिस्किटे देण्यास विसरली होती.)
२. पू. आजींनी खोलीतील साधिकेची झोपमोड होऊ नये; म्हणून तिला न उठवता बिस्किटे न घेताच चहा घेण्याचा विचार करणे आणि त्याच वेळी कुणीतरी उठवल्याप्रमाणे जाग येऊन साधिकेने उठून पू. आजींना बिस्किटे काढून देणे
त्यानंतर पू. आजींनी माझी झोपमोड होईल; म्हणून मला बिस्किटाचा पुडा फोडायला उठवले नाही. ‘असू दे, आज बिस्किटे न घेता चहाच घेऊ’, असा विचार करून त्यांनी बिस्किटाचा पुडा बाजूला ठेवला. तोच मला अचानक कुणीतरी उठवल्याप्रमाणे जाग आली आणि मी गाढ झोपेतून उठून पू. आजींना म्हणाले, ‘‘आजी काही साहाय्य हवे आहे का?’’ त्या वेळी मी पू. आजींना बिस्किटे काढून दिली. त्या एक मिनिटानंतर मी पुन्हा गाढ झोपले.
३. साधिका उठल्यावर पू. आजींनी तिला देवच सर्व करतो असे सांगणे
मी थोड्या वेळाने उठल्यावर पू. आजी मला म्हणाल्या, ‘‘मी बोललेले देवाला ऐकू गेले आणि देवाने तुला उठवले. देवच सर्व करतो.’’ त्यानंतर पू. आजी आणि मी पुष्कळ हसलो.
४. पू. आजींसंदर्भात घडलेल्या प्रसंगातून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. पू. आजींचे सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान असते. दिवसभरातील सर्वच कृती करतांना त्या देवाशी बोलत असतात. ‘देवच सर्व करतो’, असे त्या म्हणत असतात.
आ. पू. आजींसाठी देवाने मला गाढ झोपेतून उठवले आणि पुन्हा झोपवलेही.
५. प्रार्थना
‘परात्पर गुरु डॉक्टर, पू. आजींप्रमाणे माझेही मन सतत तुमच्या अनुसंधानात राहू दे. प्रत्येक कृती करतांना सतत तुम्हाला विचारून विचारून करता येऊ दे. ‘देवच सर्व करतो’, असा भाव ठेवायला मला शिकवा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१२.२०२०)
रामनाथी आश्रमात भावपूर्ण वातावरणात साजरा झालेल्या सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीच्या वेळी पू. जलतारेआजी यांना आलेल्या अनुभूती !
‘१९.११.२०२० या दिवशी माझा ‘सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी’ रामनाथी आश्रमात भावपूर्ण वातावरणात झाला. या शांतीविधीचे पौरोहित्य सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. मंदार मणेरीकर आणि श्री. ईशान जोशी यांनी केले. या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. विधीतील चैतन्यामुळे अधिक वेळ बसू शकणे
मी एरव्ही वार्धक्यामुळे १ घंट्यापेक्षा अधिक वेळ एका जागी बसू शकत नाही. मी बसल्यानंतर काही वेळाने माझी पाठ दुखू लागते; परंतु सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीसाठी मी सलग २ – ३ घंटे बसू शकले. विधीतील चैतन्यामुळे मला पाठदुखीचा त्रास झाला नाही. मुलांच्या आग्रहास्तव मी विधींच्या मध्यंतरी थोडा वेळ पलंगावर पहुडले.
२. पुरोहितांनी मला आज्यावलोकन (तुपामध्ये स्वतःचे मुख बघायला) करायला सांगितले. त्या वेळी मला स्वतःच्या मुखाच्या ठिकाणी श्री दुर्गादेवीचे मुख दिसत होते.
३. विधी चालू असतांना अखंड नामजप होणे आणि भावस्थितीत रहाता येणे
विधीच्या संपूर्ण कालावधीत माझा अखंड नामजप चालू होता. मला सभोवतालचे भान नव्हते. मला संपूर्ण वेळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होत होते आणि भावस्थितीत रहाता येत होते. शांतीसुक्त ऐकतांना माझे मन निर्विचार आणि शांत होते. ‘देव माझ्यासाठी किती करतो !’, या विचाराने माझे मन कृतज्ञतेने भरून येत होते. या विधीचे यजमान श्री. श्रीकांत आणि सौ. माया पिसोळकर यांनी माझे पाद्यपूजन केल्यानंतर पाच सुवासिनींनी माझे औक्षण केले. त्या वेळी मी एका निराळ्याच भावस्थितीत गेलेे. ‘मी त्याच स्थितीत जवळजवळ २० मिनिटे होते’, असे मला साधकांनी सांगितले.’
– (पू.) श्रीमती कुसुम जलतारे (३.१२.२०२०)
साधकांसाठी नामजप करतांना पू. (श्रीमती) कुसुम जलतारे यांना येत असलेल्या अनुभूती
१. आरंभी साधकांसाठी नामजप करण्याची भीती वाटणे, नामजप करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ कक्षात येतांना दिसणे आणि नंतर भीती दूर होणे
‘मला साधकांचे आध्यात्मिक त्रास न्यून व्हावेत’, यासाठी त्यांच्यासाठी नामजप करण्याची सेवा मिळाली. आरंभी ‘साधकांसाठी नामजप केल्यावर मला अनिष्ट शक्तींचा त्रास होईल का ?’, अशी मला भीती वाटायची. मी साधकांसाठी नामजप करतांना पहिल्याच दिवशी मला सूक्ष्मातून त्या कक्षात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ येतांना दिसले. त्यानंतर माझे मन पूर्णतः निर्विचार झाले. मला नामजप संपेपर्यंत कशाचेच भान नव्हते. माझी भीती दूर होऊन माझा अखंड नामजप होत होता. मी नामजप करतांना ‘माझ्या शेजारी शेषनाग माझ्या संरक्षणासाठी बसला आहे’, असे मला दिसत होते.
२. साधकांसाठी नामजप करतांना ‘साधकांना नेमका काय त्रास होत आहे ?’, हे स्वतःला जाणवणे आणि ‘त्रास किती प्रमाणात न्यून झाला ?’, हे अनुभवता येणे
मी साधकांसाठी नामजप करत असतांना ‘साधकांना नेमका कोणता त्रास आणि कुठे जाणवत आहे ?’, हे मला जाणवते, उदा. छातीवर दाब जाणवणे किंवा गळा दाबल्याप्रमाणे होणे इत्यादी. काही साधकांच्या मनात विचारांचे काहूर असल्यास माझ्याही मनातील विचार वाढल्याचे माझ्या लक्षात येते. नामजप पूर्ण झाल्यावर ‘साधकांचा त्रास किती प्रमाणात उणावला’, हेही मला अनुभवता येते. साधकांचा आवश्यक त्या प्रमाणात त्रास न्यून झाल्यावर मी नामजप करणे थांबवते आणि आवश्यकतेनुसार पुन्हा चालू करते.
३. साधकांचा त्रास न्यून झाल्यावर आनंद होणे आणि साधकांविषयी जवळीक वाटणे
मी आतापर्यंत ज्या साधकांसाठी नामजप केला, त्यांचा त्रास न्यून झाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ‘ते साधक दिसल्यावर देवाने त्यांना लवकर बरे केले’, असे वाटून मला आनंद होतो. माझी त्या साधकांशी नकळत जवळीक साधली जाते. ‘देव सर्वांचे कल्याण करत आहे’, हे पाहून मी समाधानी होते. साधकांचा त्रास जोपर्यंत न्यून होत नाही, तोपर्यंत मनात त्यांच्याविषयी काळजीचे असे नव्हे; परंतु विचार येतात.’
– (पू.) श्रीमती कुसुम जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |