बांगलादेशची युद्धगाथा : वर्ष १९७१ मध्ये भारताने जिंकलेल्या युद्धाची गोष्ट !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ४९ वर्षांपूर्वी प्रथमच भारताने महापराक्रम गाजवला आणि युद्ध करून पाकिस्तानचे दोन तुकडे केेले. हे युद्ध ४ डिसेंबर १९७१ या दिवशी चालू झाले आणि १६ डिसेंबर १९७१ या दिवशी संपले. या युद्धात कोणकोणते पराक्रम झाले, तसेच त्या वेळची परिस्थिती काय होती, यांविषयी जाणून घेणार आहोत. २ जानेवारी या दिवशीच्या लेखात आपण वर्ष १९७१ च्या लढाईमागील उद्देश आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व असल्यामुळे भारताला वर्ष १९७१ चे युद्ध जिंकता येणे यांविषयी पाहिले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/437113.html
४. पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल याह्या खान यांनी बांगलादेशी जनतेवर केलेले अनन्वित अत्याचार !
जनरल याह्या खान हे पाकिस्तानचे हुकूमशहा होते. त्यांना ठाऊक होते की, पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) सीमेवर भारताच्या विरोधात लढाई करणे सोपे नाही. त्यामुळे त्यांनी अशी योजना केली की, हे युद्ध पूर्व पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) सीमेवर लढले जावे. त्यामुळे त्यांना पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर रक्षण करण्याचे काम करता येईल. त्यांनी पूर्व पाकिस्तानात किल्लेबंदी करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या शहरांना किल्ले बनवून भारतीय सैन्याला आत प्रवेश करण्यापासून थांबवण्याचा त्यांचा हेतू होता. त्या वेळी त्यांनी लोकांवर अतिशय अत्याचार केले. शेख मुजीबूर रहमान यांनी मार्च १९७१ मध्ये बांगलादेश म्हणून स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यामुळे त्यांना लगेचच कारागृहात टाकण्यात आले. त्यांनी सांगितले की, हा माझा शेवटचा संदेश आहे, नंतर मी कुठे असेन ठाऊक नाही; पण बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र झालेले आहे आणि तुम्ही सगळ्यांनी या लढाईत सहभागी व्हावे.
त्यानंतर बांगलादेशच्या रेजिमेंटमधील काही सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. भारताने त्यांना ‘मुक्ती वाहिनी’ या नव्या दलात परावर्तित केले. भारतीय अधिकार्यांनी त्यांना प्रशिक्षण दिले. या मुक्ती वाहिनीच्या सैन्याने पुढील लढाईमध्ये भारतीय सैन्याला ‘दिशादर्शका’चे (गाईडिंगचे) काम केले. प्रत्यक्ष युद्ध सोडले, तर दारूगोळा आणि गुप्त माहिती पोचवणे असे सर्व प्रकारचे साहाय्य त्यांनी केले.
५. भारताने पाकिस्तानशी युद्ध जिंकून त्याचे ९४ सहस्र सैनिक बंदी बनवणे
फिल्ड मार्शल माणेकशॉ यांनी भारतीय सीमांवर फिरून भारतीय सैन्याला प्रोत्साहन दिले. पूर्व पाकिस्तानशी लढण्याची सिद्धता करत असतांना पश्चिम पाकिस्तानच्या सीमेवर लढाई कशी करायची, त्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले. चीनला कसे थोपवायचे, याचेही नियोजन ठरले. त्या काळी अमेरिका हे राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूने होते. अमेरिकेने पाकिस्तानशी ‘सेंटो’ हा लष्करी करार केला होता. त्यामुळे त्यांना कसे शांत ठेवायचे ? हा प्रश्न होता. तेव्हा सोव्हिएत संघाच्या साहाय्याने अमेरिकेला ‘चेकमेट’ देण्याचे ठरले. भारतीय नेतृत्वाने सांगितले की, अमेरिकेेेला थोपवणे शक्य नाही. तेव्हा फिल्ड मार्शल यांनी वचन दिले की, अमेरिकेचे नौदल भारतापर्यंत येण्यापूर्वीच आम्ही ही लढाई संपवू. त्यांनी जी वेळ दिली होती, त्या वेळेपूर्वीच त्यांनी लढाई संपवली. यासाठी त्या वेळेचे सैनिकी अधिकारी असलेले जगजित सिंह अरोरा, जनरल जेकब, जनरल कृष्ण राव या सर्वांचे कौतुक करायला हवेे. अक्षरश: ३ आठवड्यांच्या आत ही लढाई लढली गेली. त्यानंतर १६ डिसेंबर या दिवशी भारतीय सैन्य ढाक्यात घुसले. बांगलादेशच्या जनरल नियाझी यांनी भारतीय सैनिकांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे ९४ सहस्र बंदीवान आपल्या कह्यात घेतले आणि एका मोठ्या इतिहासाची तेथे निर्मिती झाली.
६. पश्चिम पाकिस्तानच्या सीमेवर भारतीय सैन्याने केलेला पराक्रम
पहिली लढाई पश्चिम पाकिस्तानच्या (आताच्या पाकिस्तानच्या) सीमेवर म्हणजेच राजस्थान, पंजाब आणि काश्मीर येथे झाली. पाकिस्तानने रणगाडे आणि मोठी शस्त्रे यांच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; पण आपण चांगल्या पद्धतीने लढाई लढलो. आपण तेथे नौदल आणि वायूदल यांचे साहाय्य घेतले. तेव्हा पाकिस्तानला राजस्थान, पंजाब, काश्मीरमध्ये घुसून तेथील मोठी शहरे कह्यात घ्यायची होती. यात कदाचित् त्यांना यशही मिळाले असते; पण तेथे भारतीय सैन्य अतिशय चांगल्या पद्धतीने लढले. भारतीय नौदलाने मिसाईल बोट पाठवून कराची बंदरावर आक्रमण केेले आणि तेथील पाकच्या ३ युद्ध नौकांना जलसमाधी दिली. त्यांच्या पेट्रोलियम स्थळावर आक्रमण केले. तोपर्यंत वायूदल सिद्ध होते. ३ डिसेंबरला पाकिस्तान वायूदलाने ठरवले की, भारताच्या वायूदलावर आक्रमण करून भूमीवरच त्यांना संपवायचे; परंतु पाकिस्तानला ते करता आले नाही. त्यांचे ३ डिसेंबरचे आक्रमण वाया गेले. भारताने त्यांचीच हानी केली आणि ४ डिसेंबर या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला.
७. भारताने पाकिस्तानला त्याचे सैन्य विविध ठिकाणी विखुरण्यास भाग पाडणे
भारतीय सैन्य भारत-बांगलादेश सीमेवर केंद्रित करण्यात आले. बांगलादेश सीमेवरील चौक्यांवर भारताने आक्रमणे केलेे. प्रत्यक्ष युद्ध ४ डिसेंबर या दिवशी चालू झाले असेल; पण भारताच्या अनेक कृती ३ – ४ मासांपूर्वीपासूनच चालू होत्या. चौक्यांवर आक्रमण केल्यामुळे पाकिस्तानने जे सैन्य आत तैनात केले होते, ते त्याला सीमेवर आणावे लागले. आपण पाकिस्तानच्या २०-२५ चौक्यांवर आक्रमणे करून त्या कह्यात घेतल्या. त्यामुळे मागे रक्षणासाठी ठेवलेल्या सैन्याला पाकिस्तानला पुढे आणावे लागले, म्हणजे भारताने पाकिस्तानला त्याचे सर्व सैन्य सगळीकडे पसरवण्यास भाग पाडले. त्यामुळे पाकिस्तान कुठेच सबळ नव्हते.
८. मराठा रेजिमेंटने लढाईत गाजवलेला अतुलनीय पराक्रम !
अ. भारताने बांगलादेश सीमेवर अनुमाने ३० छुप्या लढाया केल्या. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला पुढे यावे लागले. या युद्धात मराठा रेजिमेंटने अतुलनीय पराक्रम गाजवला. यात ‘फर्स्ट लाईट इनफेन्ट्री’ ही ढाक्यामध्ये घुसणारी पहिली रेजिमेंट होती. या रेजिमेंटच्या सैनिकांना युद्धात अनेक पुरस्कार देण्यात आले. माझी स्वत:ची बटालियन ‘सेव्हन मराठा लाईट इन्फेन्ट्री’ होती. तिने पाचागड येथे चढाई केली. तेथे त्यांनी पुष्कळ रक्त सांडले. मराठा रेजिमेंट विविध ५-६ लढाया लढले. या लढाईत भारताने पाकिस्तानला हरवले; परंतु यात मराठा रेजिमेंटच्या ५०० हून अधिक सैनिकांचे बलीदान कामी आले. माझ्या बटालियनच्या अनेकांना शौर्य पुरस्कार मिळाले. ‘लेफ्टनंट केपीएस ब्रार’ हे मराठा रेजिमेंटचे मुख्य अधिकारी होते. वर्ष १९८४ मध्ये सुवर्ण मंदिरात ‘जे ब्लू स्टार’ मोहीम राबण्यात आली होती. तेव्हा त्याचे नेतृत्व ब्रार यांनी केले होते.
आ. मराठा रेजिमेंटचे युद्धवाक्य आहे, ‘ड्युटी ऑन युवर करेज’, म्हणजे ‘कर्तव्यमान साहस’ हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही युद्ध गर्जना आहे. मराठा रेजिमेंटचे सैनिक आणि त्यांचे अधिकारी ही गर्जना करून लढाईला प्रारंभ करतात. जेव्हा माझी बटालियन पाचागडवर आक्रमण करण्यास सिद्ध होती, तेव्हा सैनिकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही गर्जना केली. जेव्हा कमांडर मेजर निझामुद्दीन यांनी गर्जना करण्यास तोंड उघडले, तेव्हा शत्रूच्या दिशेने एक गोळी आली आणि त्यांच्या तोंडाच्या आत जाऊन गालातून बाहेर पडली. त्यांनी गर्जनेसाठी तोंड उघडले नसते, तर त्यांच्या दाताला गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला असता. तेव्हा अनेक शूर सैनिकांनी चांगले काम केले, त्यांचे कौतुक करायला पाहिजे.
इ. शिपाई पांडुरंग साळुंके यांना राजस्थानमध्ये महावीर चक्राने गौरवण्यात आले. तेथे त्यांनी महापराक्रम गाजवला होता; पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. माझ्या सोसायटीला ‘साळुंके विहार’ हे नाव देण्यात आले. कुणाला वाटेल की, हे कुठलेतरी राजकीय नेते किंवा एखाद्या बांधकाम व्यावसायिक यांचे नाव असेल, तर तसे नाही. त्या वेळी महाराष्ट्रातील अत्युच्च पुरस्कार साळुंके यांनी मिळवले होते. त्यामुळे सोसायटीला त्यांचे नाव देण्यात आले. आमची सोसायटी साळुंके यांचा ‘६ डिसेंबर’ हा दिवस साजरा करते. या दिवशी साळुंके यांनी पाकिस्तान सीमेवर त्यांच्या प्राणाचे बलीदान दिले होते.
९. भारतीय सैन्याने नाविन्यपूर्ण पद्धतीने नैसर्गिक अडचणींवर मात करून लढाई करणे
बांगलादेशचा सीमाभाग हा अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. तेथे नद्या पुष्कळ आहेत; पण तेथे रस्ते आणि रेल्वेमार्ग चांगले नाहीत. दलदलीचा भाग असून भूमी भुसभुशीत आहे. त्यामुळे तेथे भारतीय रणगाडे आणि तोफा वापरणे शक्य नव्हते. भारताने तेथे नवीन प्रकारचे डावपेच वापरले. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सैनिकांना नद्यांच्या पलीकडे नेण्यात आले. भारताने ८५० सैनिक विमानातून तेथे ‘एअर ड्रॉप’ करून ‘पॅरा ड्रॉप’ केले. त्यामुळे लढाई निर्णायक स्थितीत पोचली. तेथे विविध पूल बनवणे शक्य नव्हते. त्यामुळे भारतीय सैनिकांनी सायकली, घोडे आणि बैलगाड्या यांचा वापर केला. लहान बोटींचा वापर करून नद्या पार करण्यात आल्या. लाकडी पूल निर्माण करण्यात आले. पाकिस्तानच्या सैन्याने विचारही केलेला नसेल की, भारतीय सैन्य अशा प्रकारे लढेल. नद्या अशा होत्या की, त्या पार करणे जमेल का ? अशी स्थिती होती. ढाक्याला जायचे म्हटले, तर ब्रह्मपुत्रा, गंगा, मेघना अशा मोेठ्या नद्या पार कराव्या लागणार होत्या. त्या भारतीय सैनिकांनी अतिशय कल्पक (इनोव्हेटिव्ह) पद्धतीने पार केल्या.
१०. भारताचे शूर सेनापती जनरल सगतसिंह यांची कामगिरी !
अ. भारताने ढाक्यावर ४ विविध दिशांनी आक्रमण केले. त्या वेळी जनरल सगतसिंह यांनी विविध गोेष्टींचा वापर करून नद्या-नाले पार केले. ते कौतुकास्पद होते. पाकिस्तानी सैन्याने जे किल्ले सिद्ध केले होते, त्यांच्याशी भारतीय सैन्य लढलेच नाही. भारतीय सैनिकांनी त्यांच्या मागे जाऊन त्यांना ‘बायपास’ केले आणि तेथे ‘रोड ब्लॉक’ लावले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या मागे ढाक्याकडे जाण्याचा रस्ताच बंद झाला. त्यामुळे ते घाबरले. काय करायचे, हे न कळल्याने त्यांचे मनोबल मोठ्या प्रमाणात ढासळले.
आ. लेफ्टनंट जनरल सगतसिंह हे आक्रमण सेनापती होते. त्यांना लढण्याचा पुष्कळ अनुभव होता. ते नाविन्यपूर्ण पद्धतीने लढायचे. वर्ष १९६७ मध्ये ते सिक्कीममध्ये १७ डिव्हिजन्सचे नेतृत्व करत होते. त्या वेळी चीनने नाथुला किंवा चोला भागात घुसखोरी केली होती. जनरल सगतसिंह यांनी त्याविषयी कुणालाही विचारले नाही. त्यांनी थेट कायदा हातात घेतला आणि सैनिकांना चिनी सैन्यांवर आक्रमण करण्याचे आदेश दिले. ३ दिवस तेथे युद्ध झाले. त्याला ‘चोला प्रसंग’ असे म्हटले जाते. भारताने ३५० चिनी सैनिक तेथे मारले. त्याची किंमत भारतानेही ७० सैनिकांचे बलीदान देऊन दिली.
जनरल सगतसिंह यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व तेथे नसते, तर चोलासारखी लढाई तेथे लढली गेली नसती आणि चिनी सैनिकांचे रक्त तेथे सांडले नसते. त्यानंतर वर्ष १९६७ पासून १९८६ पर्यंत ती सीमा शांत होती; कारण चीनला मोठा धक्का बसला होता. ज्या पद्धतीने जनरल सगतसिंह यांनी काम केले, त्यात ते उत्कृष्ट दर्जाचे सेनानी होते, यात काही संशय नव्हता. ढाक्यावर नियंत्रण मिळवणारे ते पहिले सैनिक होते. भारतीय सैन्य ही अतिशय यशस्वी लढाई लढले. अमेरिकेच्या युद्धनौका येण्यापूर्वीच ही लढाई भारताने जिंकली होती आणि ९४ सहस्र सैनिकांना भारताने तेथे बंदी केले होते.
११. वर्ष १९७१ च्या लढाईत साडेतीन सहस्रांहून अधिक भारतीय सैनिकांनी बलीदान देणे
या युद्धात काही जणांना परमवीर चक्र मिळाले. जनरल होशियार सिंह यांनी जम्मूच्या जवळ एक लढाई लढली. त्या लढाईत त्यांना परमवीर चक्राने गौरवण्यात आले. राजस्थानमध्ये लोंगीवाला लढाई लढली गेली. तेथील कंपनी कमांडरला महावीर चक्र देण्यात आले. त्यावर नंतर ‘बॉर्डर’ चित्रपट निर्माण करण्यात आला. साडेतीन सहस्र सैनिकांहून अधिक जणांनी त्यांचे रक्त येथे सांडले. आपण त्यांना वंदन करायला पाहिजे.
१२. भारत-पाकिस्तान युद्धाचा लाभ
वर्ष १९७१च्या युद्धानंतर पाकिस्तानचे २ तुकडे झाल्याने पाक भारताशी एक बरोबरीचा शत्रू म्हणून कधीही लढाई लढू शकला नाही. त्यानंतर त्यांनी छुपे युद्ध चालू केेले. अन्य भारतात आतंकवादी चालू केला; पण पारंपरिक युद्ध त्यानंतर जवळजवळ झाले नाही; वर्ष १९९९ चे एक मर्यादित युद्ध होते.
१३. भारताने युद्ध जिंकणे; पण तहात हरणे (भारताच्या ३ मोठ्या चुका)
अ. या युद्धामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, ही चांगली गोष्ट घडली. त्यामुळे त्याची युद्धक्षमता न्यून झाली. हे युद्ध जरी भारताने चांगल्या प्रकारे जिंकले असलेे, तरी त्यात भारताच्या ३ मोठ्या चुका झाल्या. पाकिस्तानला त्याचे ९४ सहस्र बंदीवान परत देण्यापूर्वी भारताला काश्मीर प्रश्न कायमचा सोडवता आला असता आणि तेथील सीमा आंतरराष्ट्रीय सीमेत परावर्तीत केली असती, तर ती एक मोठी संधी होती. भूत्तो यांनी सिमला करारमध्ये म्हटले होते की, आम्ही तुमच्याशी चांगले वागू; पण नंतर त्यांनी शब्द पाळला नाही. त्याने भारताच्या विरोधात खलिस्तानी आतंकवाद चालू केला. त्यात श्रीमती गांधी यांचा मृत्यू झाला. काश्मीरची समस्या त्या वेळी कायमची सोडवता आली असती. ते भारताने केले नाही. ते भारताचे एक अपयश होते.
आ. दुसरी चूक म्हणजे भारताने त्यांचे ९४ सहस्र बंदीवान सोडले; पण भारताचेे ९० युद्धकैदी पश्चिम पाकिस्तानात होते, त्यांना सोडवणे भारताला जमले नाही. त्याचे आजही वाईट वाटते.
इ. भारताला ईशान्य भारताशी जोडणारा भाग आहे, त्याला ‘सिलीगुडी कॉरिडॉर’ म्हटले जाते. तो अतिशय निमुळता कॉरिडॉर आहे. तेथे ‘चिकन नेक’ आहे. तो एक लहानसा भाग आहे. युद्धाच्या वेळी चीन त्या ठिकाणी भारताला तोडू शकतो. बांगलादेशला सांगून चिकन नेकची रूंदी वाढवता आली असती, तर संभाव्य परिस्थिती कायमची थांबवता आली असती. अलीकडे देहलीत भीषण दंगल झाली होती, तेव्हा काही राष्ट्रद्रोह्यांनी चेतावणी दिली होती की, आम्ही सिलीगुडी कॉरिडॉरमध्ये रस्ते बंद करून भारताला ईशान्य भारतापासून वेगळे पाडू शकतो. त्यामुळे तो धोका कायम आहे. (समाप्त)
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे