मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी जकी-उर-रहमान लखवी याला पाकमध्ये पुन्हा अटक

‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या बैठकीपूर्वी जगाला दाखवण्यासाठी पाकची कारवाई ! – भारत

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकने आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी जकी-उर-रहमान लखवी याला पुन्हा एकदा अटक केली आहे. त्याला मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणाच्या प्रकरणी जामिनावर सोडण्यात आले होते. आता आतंकवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ‘फायनेंशियल अ‍ॅक्शन टॉस्क फोर्स (‘एफ्.ए.टी.एफ्.’ची)ची लवकरच बैठक होणार आहे, त्या बैठकीत ‘पाकला ‘करड्या’ (ग्रे) सूचीमध्ये ठेवायचे कि ‘काळ्या’ (ब्लॅक) सूचीमध्ये टाकायचे ?’, यावर चर्चा होणार आहे. पाकला काळ्या सूचीमध्ये टाकण्यात  येऊ नये; म्हणून जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी पाकने ही कारवाई केली आहे, असेच तज्ञांचे म्हणणे आहे.

भारताने या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, पाकसाठी अशा प्रकारची कारवाई करणे सामान्य गोष्ट झाली आहे. तो नेहमीच ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या बैठकीपूर्वी आतंकवाद्यांना अटक करतो. जुलै २०१९ मध्येही या बैठकीच्या पूर्वी लष्कर-ए-तोयबाचा  संस्थापक हाफीज सईद याला अटक करण्यात आली होती.