विरोध डावलून शासन मेळावली (सत्तरी) येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार

१५ जानेवारीपर्यंत प्रकल्पाची सीमा आखण्याची आणि मेळावली येथे पोलीस चौकी उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

पणजी, २ जानेवारी (वार्ता.) – गोवा शासन स्थानिकांचा विरोध डावलून मेळावली, सत्तरी येथे प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १ जानेवारी या दिवशी ‘आयआयटी’च्या पदाधिकार्‍यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित ‘आयआयटी गोवा’ प्रकल्पाला अनुसरून विद्यमान स्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीविषयी माहिती देतांना ‘आयआयटी’चे पदाधिकारी म्हणाले, ‘‘या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मेळावली (सत्तरी) येथील प्रस्तावित ‘आयआयटी गोवा’ प्रकल्पाला अनुसरून सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकल्पाची सीमा आखण्याचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच यानंतर बांधकामासंबंधीच्या अनुमतीचे प्रस्ताव मार्गी लावणे आणि वाढीव ‘एफ्.ए.आर्.’ला मान्यता देण्यास सांगितले आहे. प्रस्तावित प्रकल्पाजवळ पोलीस चौकी उभारण्यास सांगण्यात आले आहे.’’

शेळ, मेळावली ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध कायम

शेळ, मेळावली ग्रामस्थांनी प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाला त्यांचा विरोध कायम ठेवला आहे. सुमारे २०० ग्रामस्थांनी गावात जाणारा मुख्य रस्ता १ जानेवारी या दिवशीही अडवून धरला होता. प्रकल्पाचे सर्वेक्षण करणार्‍यांना प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यापासून वंचित केले जात आहे. गेले कित्येक मास ग्रामस्थांचे हे आंदोलन चालू आहे.