इंग्लंडहून गोव्यात आलेल्या १२ कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून नकारात्मक
इंग्लंडहून गोव्यात आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून तपासणीसाठी पुणे येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यामधील १२ रुग्णांचे नमुने नवीन कोरोना विषाणूला अनुसरून नकारात्मक आले आहेत, तर इतर नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. गतवर्षी ९ ते २० डिसेंबर या काळात इंग्लंड येथून ९७६ प्रवासी गोव्यात आले आणि यामधील ३८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. कोरोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आल्याने इतर २६ जणांनाही कोरोनाची लागण झाली. इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांना त्यांच्या नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत रुग्णालयात रहाणे बंधनकारक आहे, तसेच रुग्णांचा कोरोनाला अनुसरून अहवाल नकारात्मक आला, तरी घरी अलगीकरणात रहाणे बंधनकारक असेल.
गोव्यात कोरोनाच्या नवीन विषाणूची चाचणी करणारी प्रयोगशाळा उभारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गोव्यात दक्षिण आणि उत्तर गोवा यांच्यासाठी कोरोनाची चाचणी करण्यासाठी प्रत्येकी एक ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ यंत्र आणण्यात येणार आहे. यामुळे राज्याची चाचणी करण्याची क्षमता सध्याची प्रतिदिन १ सहस्र ८६० वरून ती २ सहस्र ८६० वर पोहोचणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.