औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामकरण करण्यास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही विरोध
जालना – औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने ठामपणे विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘संभाजीनगर’ नामकरणाला विरोध केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही औरंगाबादच्या ‘संभाजीनगर’नामकरणाला काँग्रेसचा विरोधच राहील, असे २ जानेवारी या दिवशी जालना येथे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याविषयी सत्ताधारी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असतांना काँग्रेसने मात्र या नामांतरास ठाम विरोध केला आहे. ते पुढे म्हणाले की, औरंगाबादच्या नामकरणावरून शिवसेना आणि काँग्रेस या २ पक्षांत कोणतीही नुरा कुस्ती चाललेली नाही. औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील. औरंगाबादचे नामकरण हा महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हे स्थानिक पातळीवरचे सूत्र आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.